जुना आखाड्यातून हकालपट्टी; 'IIT'ian Baba' अभय सिंह नेमकं काय बोलले? का झाली कारवाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:05 IST2025-01-20T19:01:30+5:302025-01-20T19:05:04+5:30
IITian Baba Abhay Singh: प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आलेल्या 'IIT'ian Baba' अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

IITian Baba Abhay Singh: प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यात देशातील कानाकोपऱ्यातून साधू-संत आले आहेत. यातील काही बाबांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये 'IITian Baba' अभय सिंह (Abhay Singh) ची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, आता त्यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'IITian Baba' अभय सिंह अचानक कुंभमेळ्यातून दिसेनासे झाले आहेत.
कुंभमेळ्यात आलेले अनेकजण त्यांना भेटायला येत आहेत, पण 'IITian Baba' आता त्यंच्या आश्रमात नाहीत. 'IITian Baba' अचानक गायब झाल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. एवढी प्रसिद्धी मिळवून बाबांनी महाकुंभ का सोडला? असे प्रश्न लोक विचारत आहेत. अनेक वृत्त वाहिन्यांचे लोकही त्यांच्या मुलाखतीसाठी येत आहेत, पण त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
'IITian Baba' अभय सिंह यांनी महाकुंभ सोडल्याबाबत जी माहिती समोर येत आहे, ती अशी की, 'मसानी गोरख बाबा' अभय सिंह यांच्यावर आपल्या गुरूंविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे गेल्या शनिवारी रात्री त्यांना जुना आखाड्याच्या आश्रमातून हाकलून देण्यात आले. जुना आखाड्याचे प्रवक्ते महंत नारायण गिरी म्हणाले की, अभय सिंह अद्याप संत झाले नाहीत, ते एक साधारण तरुण असून, स्वयंघोषित बाबा म्हणून कुंभमेळ्यात वावरत होते.
महंत नारायण गिरी यांनी सांगितले की, अभय सिंह महंत सोमेश्वर गुरूंसोबत आखाड्यात आले होते. त्याने आपले गुरु महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरले, त्यामुळे त्यांना आखाड्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अभय सिंह यांचे कृत्य गुरु-शिष्य परंपरेच्या आणि संन्यासाच्या विरुद्ध आहे. ज्याला गुरूंबद्दल आदर नाही, त्याला सनातन धर्माचाही आदर राहणार नाही. जुना आखाड्यात शिस्त ही सर्वोच्च आहे.
नारायण गिरी पुढे म्हणाले की, आखाड्यातील प्रत्येक सदस्याला शिस्तीने जगावे लागते, मात्र अभय सिंह यांनी आपल्या गुरूंचा अपमान करून ही परंपरा खंडित केली. आखाड्याच्या शिस्तपालन समितीने अभयवर कारवाईची शिफारस केली आणि त्याला आखाड्यातून हाकलून दिले.
कोण आहेत 'IITian Baba' अभय सिंह? सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले अभय सिंह सांगतात की, त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतल्यानंतर एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये नोकरी केली. नोकरी सोडल्यानंतर संन्यासी होण्याचे ठरवले. तुमचे गुरू कोण, असे विचारले असता ते म्हणाले की, मी ज्यांना भेटतो, त्यांच्याकडून शिकतो. आखाड्यांबाबत ते म्हणाले की, चार-पाच दिवस तिथे राहण्याचा माझा प्लॅन होता आणि मी आखाड्यांचे काम पाहण्यासाठी आलो होतो.
गेल्या काही दिवसांपासून 'IITian Baba' अभय सिंह यांची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. ते आपल्या व्हिडिओमध्ये देशातील शिक्षण पद्धती आणि नातेसंबंधांवर टीका करताना दिसतात. खासकरुन तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. पण, आता ते कुंभमेळ्यातून बेपत्ता झाल्यामुळे त्यांचे चाहते गोंधळात पडले आहेत.