काश्मीरमधील नदी अचानक झाली गायब; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू, ग्रामस्थांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:42 PM2022-02-17T14:42:05+5:302022-02-17T14:44:49+5:30

नदी अचानक गायब झाल्यानं गावकरी बुचकळ्यात; संपूर्ण गावात भीतीचं वातावरण

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील नदी अचानक गायब झाल्यानं ग्रामस्थ चिंतेत आहेत. भूस्खलन झाल्यानं नदीपात्रात मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे पहाडी नदी पात्र ५०० मीटरपर्यंत कोरडंठाक पडलं आहे.

दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या अनंतनाग जिल्ह्यातून पहाडी नदी वाहते. नदीपात्रात झालेल्या भूस्खलनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. वरून वाहत येणारं पाणी खड्ड्यात जमा होतंय. त्यामुळे नदीपात्र कोरडं पडलंय.

नदीपात्र कोरडं पडल्यानं शेकडो ट्राऊट माशांचा मृत्यू झालाय. नदीच्या पात्रात एकाएकी भूस्खलन कसं झालं याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. मात्र त्यांना अद्याप तरी कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही.

नदी पात्रात अचानक खड्डा निर्माण झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. खड्डा तयार होताच वरून येणारं पाणी वेगानं त्यात जमा होऊ लागलं. त्यामुळे पहाडी नदीचं ५०० मीटरपर्यंतच पारडं सुकून गेलं.

नदी पात्रात तयार झालेला खड्डा २०० मीटर खोल आहे. यामुळे नदीत मिळणारे ट्राऊट मासे पूर्णपणे संपून जातील अशी भीती स्थानिकांना आहे. या परिसरात अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून पावलं उचलण्याची मागणी स्थानिकांनी प्रशासनानं केली आहे.

या नदीपात्रात ट्राऊट माशांची संख्या जास्त आहे. याती माशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे मासे थंड पाण्यातच आढळून येतात. ० ते २० डिग्री सेल्सिअस तापमानाच ट्राऊट मासे सापडतात. या माशांमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आढळतात.

नदीपात्रात असलेला चुनखडक विरघळला असल्यानं भूस्खलन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चुनखडक पाण्यात विरघळल्यानं अचानक जमीन खचून मोठा खड्डा निर्माण झाल्याचं काही शास्त्रज्ञांना वाटतं.

या भागात आणखी काही ठिकाणी भूस्खलन होऊ शकतं. त्यामुळे स्थानिकांनी नदीपात्रापासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या भागात कलम १४४ देखील लागू करण्यात आलं आहे.