२०२४ मध्ये BJPसमोर पवारांसह ५ विरोधी नेत्यांचे तगडे आव्हान! मोदी-शाह करेक्ट कार्यक्रम करणार? By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 08:15 PM 2022-09-04T20:15:24+5:30 2022-09-04T20:20:02+5:30
Lok Sabha election 2024: काँग्रेस बॅकफूटवर गेल्याने अन्य विरोधी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या असून, भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी विरोधक रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, अनेक केंद्रीयमंत्री कामाला लागले आहेत. भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून, लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करण्याची रणनीति भाजपकडून आखली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजपसमोर विरोधक नवी आघाडी स्थापन करून तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजापाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी आधीच सुरु केली होती. आता काँग्रेस आणि इतर विरोधकही या इलेक्शन मोडमध्ये येताना दिसत आहेत. देशात काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत झालेले दिसत असल्याने काँग्रेसमधून दिग्गज नेते मंडळी बाहेर पडताना दिसत आहेत. तर काँग्रेस कमजोर पडल्याने विरोधी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षाही उंचावलेल्या आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा एकत्रित उमेदवार देण्याच्या भूमिकेतून विरोधकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना पवार दिल्लीत सक्रिय होते.
यातच बिहारमध्ये भाजपाची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत गेलेले नितीश कुमार यांना विरोधकांचे नेतृत्व करण्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अरविंद केजरीवाल, दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर त्यांचे लक्ष आता गुजरात निवडणुकीकडे आहे, तर लोकसभेसाठीही ते पर्याय ठरण्याची शक्यता दिसते आहे.
अरविंद केजरीवाल, नितीशकुमार, ममता बॅनर्जी आणि शरद पवार ही चार नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी काळात आव्हान म्हणून उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत या नेत्यांना रोखण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये भाजपाची साथ सोडून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथने नितीशकुमार हे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, भाजपने त्यांच्यासमोर अडचणी आणण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. नितीश यांच्या जेडीयूतील ६ पैकी ५ आमदार मणिपुरात भाजपत सामील झाले आहेत. बिहारमध्येही नितीशकुमार यांच्या पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
केंद्रात भाजप सत्तेत असताना दिल्लीत दोन वेळा आपच्या अरविंद केजरीवालांनी कमाल करुन दाखवली. इतकेच नाही तर पंजाबात काँग्रेसच्या संघर्षात आणि भाजपच्या एनडीएत झालेल्या फाटाफुटीचा फायदा घेत तिथेही केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली. आता त्यांचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांकडे आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आपचे आव्हानही नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर असेल.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आव्हान देत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षाही पंतप्रधान होण्याची असल्याचे सांगितले जात आहे. बंगाल सरकारमधील १६ मंत्री टार्गेटवर असल्याचेही सांगण्यात येत होते. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आहे. यात त्या किती बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांच्या उमेदवाराला पसंती देणार की, स्वतंत्र भूमिका बजावणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात विरोधकांचे एकत्रीकरण व्हावे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. कोणतेही मोठे पद न घेता, पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याची घोषणा पवारांनी केली आहे. मात्र राज्यात नुकतेच झालेल्या सत्तांतराने भाजपाने त्यांच्यासमोरही अडचण उभी करुन ठेवलेली आहे. येत्या काही दिवसांत पवार हे नितीश कुमार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे आता पवारांना राज्यातच रोखण्यासाठी अमेठीप्रमाणेच बारामती मतदारसंघावर भाजपा जोर लावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पवार हे आव्हान कसे रोखणार हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.