Independence Day: यंदा देशाचा ७५ वा की ७६ वा स्वातंत्र्य दिन?; अनेक जण कन्फ्यूज, वाचा खरे उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 06:39 PM 2022-08-15T18:39:49+5:30 2022-08-15T18:42:07+5:30
भारत आज १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्याचा सण साजरा करत आहे. भारत सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे, परंतु यादरम्यान देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन की ७६ वा स्वातंत्र्यदिन याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
खरे तर १५ ऑगस्ट १९४८ हा भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन होता, असा युक्तिवाद काही लोक करतात, २०२२ हा स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र आतापर्यंत भारतात साजरे झालेल्या स्वातंत्र्यदिनांची संख्या मोजली तर हा ७६ वा स्वातंत्र्यदिन असेल.
याचं कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीपासून २०० वर्षांहून अधिक काळानंतर भारताला मिळालेला स्वातंत्र्य हा देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन ठरला होता. यामुळेच १५ ऑगस्ट २०२२ हा दिवस ७६ वा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यामुळे एकंदरीत सांगण्याचा हेतू एवढाच की भारत आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे पण तो आज आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल सर्व देशवासियांना मोठ्या प्रमाणात आवाहन केले ज्यामध्ये देशभरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या संदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की, 'हर घर तिरंगा'चा उद्देश राष्ट्रध्वजाशी असलेला संबंध औपचारिक किंवा संस्थात्मक ठेवण्यापेक्षा अधिक वैयक्तिक करणे हा आहे.
'आझादी का अमृत महोत्सव' या बॅनरखाली यंदाचा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी खास आहे. आझादीचा अमृत महोत्सव भारतातील लोकांना समर्पित आहे ज्यांनी केवळ भारताला त्याच्या उत्क्रांतीच्या प्रवासात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर आत्मनिर्भर भारताच्या भावनेने प्रेरित, भारत 2.0 सक्रिय करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रेरित करण्यासाठी शक्ती आणि क्षमता देखील दिली. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याचं ठरवलं.
अमृत महोत्सवाच्या रूपात, स्वातंत्र्य आणि भारतातील लोकांच्या गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या ७५ आठवड्यांमध्ये अनेक कार्यक्रम आणि मोहिमा आयोजित केल्या गेल्या आहेत.