चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:09 PM2020-06-23T18:09:51+5:302020-06-23T18:54:00+5:30

एकीकडे लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) तणाव वाढत चालला आहे. तर दुसरीकडे चीनने आता दक्षिण चीन सागरातही दादागिरी करायला सुरुवात केली आहे. भारतही चीनच्या अशा धूर्त चाली उधळून लावत आहे. आता संपूर्ण जगाने चीनचे घाणेरडे राजकीय डावपेच आणि धोखेबाजीचा स्वभाव ओळखला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनीही चीनवर निशाणा साधला आहे. पॉम्पियो म्हणाले, 'आम्ही एकिकडे जगातील सर्वात लोकप्रिय आणि लोकशाही असलेल्या भारताकडे पाहतो. तर, दुसरीकडे चीन दक्षिण चीन सागराचे सैनिकीकरण करत आहे आणि अवैधरित्या तेथील भागांवर दावा सांगताना दिसत आहे. यामुळे महत्वपूर्ण असलेल्या समुद्री मार्गांना धोका निर्माण झाला आहे आणि त्याने पुन्हा एकदा वचन भंग केला आहे.'

ज्या दक्षिण चीन सागरात चीन दादागिरी दाखवत आला आहे, आता त्याला तेथेच घेरण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया-अमेरिका आणि जपान यांनी चक्रव्यूह तयार केले आहे.

रणनीतीच्या दृष्टीने विचार केल्यास, दक्षीण चीन सागर भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारताच्या व्यापाराचा हा पारंपरिक मार्ग आहे. तर दुसरीकडे चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे त्याच्या शेजारील देशही अस्वस्थ आहेत.

चीन एअर डिफेन्स आयडेन्टिफिकेशन झोन तयार करत आहे. यात, तो तैवान आणि व्हिएतनामच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटांचाही जबरदस्तीने समावेश करत आहे.

या झोनमध्ये चीन प्रतास, पार्सेल आणि स्पार्टले बेटांचा समूहदेखील सामील करत आहे. या बेटांवरून त्याचा तैवान, व्हिएतनाम आणि मलेशियासोबत वाद सुरू आहे. चीनमुळे हैराण झालेल्या या देशांची भारतासोबत अधिक घट्ट मैत्री झाल्याने चीनला मिर्ची लागली आहे.

एवढेच नाही, तर जगातील देशांच्या यादीवर नजर फिरवली, तर भारताच्या बाजूने अनेक देश उभे असलेले दिसतात.

1998मध्ये भारताने अणुचाचणी केली तेव्हा फ्रान्स ठामपणे भारताच्या बाजूने उभा होता. 1971 आणि करगील युद्धादरम्यान इस्रायल भारताच्या बाजूने होता. 1962ला झालेल्या चीन युद्धाच्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचे समर्थन केले होते. युरोपात तर जर्मनीपासून इंग्लंडपर्यंत सर्वच देश भारताबरोबर आहेत.

कोणत्याही परिस्थितीत आम्ही भारताच्या पाठीशी ठाम पणे उभे राहू, असे अमेरिकेने अनेकदा म्हटले आहे. तर राजनाथ सिंह रिशियासोबतच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी स्वतःच तेथे गेले आहेत.

चीनसोबत केवळ दोनच देश दिसतात. एक पाकिस्तान आणि दुसरा उत्तर कोरिया. तसे पाहिले, तर हे दोघेही आंतरराष्ट्रीय पटलावर एकाकीच दिसतात. त्यांना जागतीक स्तरावर फारशी किंमत नाही.