इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:14 AM 2024-09-21T10:14:51+5:30 2024-09-21T10:28:19+5:30
पेजर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने लेबनानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या सदस्यांच्या पेजरमध्ये स्फोट झाला. आता या पेजर स्फोटात भारतात जन्मलेल्या नार्वेजियन नागरिकाशी कनेक्शन पुढे आले आहे. केरळच्या वायनाड येथील या व्यक्तीने नॉर्वे जाण्याआधी धर्मगुरू बनण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्याचे नाव लेबनानमध्ये झालेल्या पेजर स्फोटात समोर आले आहे.
या पेजर स्फोटात हिजबुल्लाहच्या सैनिकांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यात १२ जणांचा मृत्यू आणि ३००० हून अधिक लोक जखमी आहेत. तर सीरियामध्येही ७ जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही पुढे आले होते.
वायनाडच्या ३७ वर्षीय रिंसन जोस जो आता नॉर्वेचा नागरिक आहे. रिंसनवर सोफिया, बुल्गारिया येथील नॉर्टो ग्लोबल लिमिटेड कंपनीचा मालक असल्याचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी या कंपनीचा तपास करत आहेत ज्यांनी शेकडो पेजरची विक्री केली आहे.
त्यात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने आणि केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी वायनाडच्या मानंतवाडी इथल्या रिंसनच्या वडिलोपार्जित ओंडायांगडी गावातून माहिती गोळा केली. वायनाड जिल्हा पोलीस प्रमुख तापोश बसुमाथरी यांनी रिंसनच्या अनेक ठिकाणांवर धाड टाकल्याची माहिती दिली.
माध्यमात ही बातमी आल्यानंतर रिंसनच्या कुटुंबाची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली आहे. कुटुंबाच्या सूत्रांनुसार, रिंसनचे वडील मोथेदास जोस आणि आईचं नाव ग्रेसी आहे. ते शिलाईचं काम करतात. रिंसनचा भाऊ यूकेत काम करतो तर त्याची बहिण आयरलँडमध्ये नर्स आहे. रिंसन हा त्याच्या पत्नीसह नॉर्वेमध्ये राहतो, नोव्हेंबर २०२३ मध्ये तो अखेरचा घरी आला होता त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये तो निघून गेला.
रिंसनचे काका थानकाचन यांनी सांगितले की, रिंसनचं अखेरचं ३ दिवसापूर्वी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्याचा फोनवरून संपर्क नाही. शुक्रवारी रिंसनच्या पत्नीलाही फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. आता माध्यमात आलेल्या बातमीनं आम्ही चिंताग्रस्त आहोत. त्याला कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप त्यांनी केला.
नॉर्टा ग्लोबलनं पेजरच्या विक्रीत मदत केली होती. फर्मची वेबसाईट, ज्यात कंन्सल्टिंग, टेक्नोलॉजी, पेमेंट इंटीग्रेशन, रिक्रूटमेंट आणि आऊटसोर्सिंगवर यावर फोकस करणारी आधुनिक तंत्रज्ञान असणारी कंपनी असा उल्लेख करण्यात आला होता तो हटवला गेला आहे.
बल्गेरियाची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी म्हणाली की नॉर्टा ग्लोबल आणि त्याच्या मालकाने वस्तूंच्या विक्री किंवा खरेदीचा कोणताही व्यवहार केलेला नाही. जे टेरर फंडिंग कायद्यांतर्गत येते. नॉर्टाचं बल्गेरियाई हेडक्वॉर्टर सोफियाजवळ एका अपार्टमेंटमध्ये आहे.
ओंडयांगडी परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, ते रिंसनला एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून ओळखतात तर रिंसननं काहीही चुकीचे केले नाही अशी खात्री त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. रिंसनने ओंडयांगडी शाळेत शिक्षण घेतले, नंतर एक वर्ष सेमिनरीमध्ये गेले आणि नंतर वायनाड आणि बंगळुरू येथे शिक्षण सुरू ठेवले.
पुढील शिक्षणासाठी नॉर्वेला जाण्यापूर्वी त्याने बेंगळुरूमधील कॉल सेंटरमध्ये काम केले होते आणि २०१० मध्ये पाँडिचेरी येथून एमबीए केले होते. रिंसन तिथे कंपनीचा मालक आहे त्याबाबत माहिती नव्हती. तो एका कंपनीत कर्मचारी होता...कुटुंब तितकसं समृद्ध नाही. आताही त्याचे आईवडील घरी टेलरिंगचे काम करतात असं काकाने सांगितले.