भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 09:25 AM2021-04-11T09:25:24+5:302021-04-11T09:34:02+5:30

Coronavirus Vaccination : सध्या देशात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे लसीकरण मोहीम

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचे आरोप केले जात आहेत.

परंतु अशा परिस्थितीतही भारतानं विक्रमी कामगिरी केली आहे. भारत हा जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहीम राबवणारा देश बनला आहे.

देशात केवळ ८५ दिवसांच्या विक्रमी वेळेत नागरिकांना १० कोटी डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, अमेरिकेत ८९ दिवसांत तर चीनमध्ये १०२ दिवसांमध्ये १० कोटी डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिली.

जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर कायम आहे.

देशात दररोज सरासरी ३८ लाख ९३ हजार २८८ लसींचे डोस दिले जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं.

अमेरिकेनं ८५ दिवसांणद्ये ९ कोटी २० लसींचे डोस दिले, तर चीन आणि ब्रिटननं या कालावधीत अनुक्रमे ६ कोटी १० लाख आणि २ कोटी १० लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस दिले.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयानंदेखील यासंदर्भातील एक चार्ट जारी केला आहे. तसंत कोरोनामुक्त भारतसाठी हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणापैकी ६०.६२ टक्के लसीकरण ८ राज्यांमध्ये करण्यात आलं आहे.

यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

देशात १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली होती.

त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात फ्रन्टलाईन व्हर्कर्सना लसीकरण करण्यात आलं.

त्यानंतर मार्च महि्यात ६० वर्षांपेक्षा अधिक आणि त्यानंतर ४५वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोबाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत सरसकट लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता कमी वयातील मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावं अशी मागणी होत आहे.

Read in English