Ayatollah Ali Khamenei: अयातुल्ला खोमेनींनी भारताविरोधात गरळ का ओकली?; मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:00 PM2024-09-18T14:00:23+5:302024-09-18T14:13:36+5:30

इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी भारतातील मुस्लिमांची तुलना फिलिस्तान आणि म्यानमारशी केली आहे. खोमेनी यांच्या विधानानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यानेही त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

भारतानं त्यांच्या विधानाचा कठोर शब्दात निषेध करत म्हटलंय की, भारताविरोधात बोलणाऱ्या देशांनी आधी स्वत:कडे पाहिले पाहिजे. इराणमध्ये सुन्नी मुस्लिमांवर वर्षोनुवर्ष अत्याचार होतायेत त्याकडे भारताचा रोख होता त्यानंतर अयातुल्ला खोमेनी यांच्या विधानाचं कारण पुढे आले आहे.

तज्ज्ञांनुसार, पश्चिम आशियात भारताचा कल इस्त्रायलच्या दिशेने आहे त्यासोबतच इराणकडून तेल आयात करण्यात भारत उशीर करत आहे. त्यामुळे इराणी नेता भारतावर संतापले आहेत. इराणचे नेते अशाप्रकारे टिप्पणी करून त्यांच्याकडे लक्ष वेधू इच्छित आहेत असं त्यांनी सांगितले.

तेल खरेदी न केल्याने खोमेनी नाराज - अयातुल्ला खोमेनी यांनी चीनच्या उईघुर मुस्लिमांबाबत कोणतेही भाष्य केले नाही किंवा गाझाबाबत भारताच्या अलीकडील विधानांकडे लक्ष दिले नाही. दुसरीकडे अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करत नाही.

पश्चिम आशियात झालेल्या तणावात यावर्षी इराणकडून तेल आयात करण्याची योजना रद्द केली. काही वर्षापासून इराण आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत झाले आहेत परंतु तेल आयातीत विलंब आणि गाझा युद्धात इस्त्रायलचं समर्थन केल्याने खोमेनी नाराज आहेत.

परराष्ट्र मंत्रालयानुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारत आणि इराण यांच्या द्विपक्षीय व्यापार २.३३ बिलियन डॉलर इतका होता. ज्यात वर्षाला २१.७६ टक्के वाढ होत राहिली. एप्रिल २०२३ ते जुलै २०२३ या काळात दोन्ही देशात ६६०.७० मिलियन डॉलर उद्योग झाला. मागील वर्षीच्या तुलनेने २३.३२ टक्के व्यवहारात घट झाली.

भारत आणि इराण यांच्यात चाबाहार पोर्ट आणि तेल खरेदीशिवाय अनेक मुद्द्यांवर करार झालेत. अमेरिकेच्या दबावतंत्रानंतरही भारताने समतोल धोरण अवलंबून इराणसोबत चांगले संबंध कायम ठेवले आहेत. तरीही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी केलेल्या विधानाने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

काय म्हणाले अयातुल्ला खोमेनी? - भारत, म्यानमार, गाझा येथे मुस्लीम पीडित आहेत. इस्लामच्या शत्रूंनी नेहमीच आमची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मुस्लिमांना काय त्रास सहन करावा लागतो याची आपल्याला कल्पना नसेल तर आपण स्वतःला मुस्लिम समजू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

भारताचं सडेतोड उत्तर - इराणच्या सर्वोच्च नेत्याने केलेले विधान निषेधार्ह आहे ते आम्ही स्वीकारत नाही. भारतातील अल्पसंख्याकांवर बोलणाऱ्यांनी आधी त्यांच्याकडीन मानवाधिकार रेकॉर्ड पाहिला पाहिजे असं उत्तर भारताच्या परराष्ट्र खात्याने दिले आहे.

इस्त्रायलनेही अयातुल्ला खोमेनी यांना सुनावलं - भारतात मुस्लिमांकडे जितकं स्वातंत्र्य आहे तितकं इराणमध्ये नाही. तुम्ही तुमच्या लोकांचे मारेकरी आहात. भारत आणि इतर देशांत मुस्लिमांकडे स्वातंत्र आहे जे इराणमध्ये नाही. इराणचे लोक लवकरच स्वातंत्र होतील अशी अपेक्षा आहे असं भारतातील इस्त्रायल राजदूत रियुवेन अझर यांनी म्हटलं.