भारताच्या ताफ्यात येणार इस्त्रायली 'चित्ता'; पीओकेमधल्या दहशतवाद्यांचा बनणार 'काळ' By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 06:23 PM 2020-02-04T18:23:54+5:30 2020-02-04T18:28:47+5:30
पाकिस्तान आणि चीनकडून वाढता ड्रोनचा धोका आणि दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. लखनऊ येथे होणाऱ्या डिफेन्स एक्स्पोमध्ये इस्राईलच्या मदतीने अत्यंत घातक हेरॉन टीपी ड्रोन तयार करण्यासाठी करार केला जाणार आहे.
'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत भारत प्रथमच इस्त्रायली मानवरहित लढाऊ ड्रोन विमान हेरॉन टीपी खरेदी करणार आहे. ही ड्रोन विमाने इस्त्रायली कंपनी आयएआयकडून खरेदी केली जातील परंतु ती भारतात तयार केली जातील.
हेरॉन टीपी ड्रोन मध्यम उंचीवर (45००० फूट) सुमारे 36 तास सतत उड्डाण करू शकते. त्याचे एकूण वजन 5670 किलो आणि लांबी 14 मीटर आहे. यात 1200 हॉर्स पॉवरचं शक्तिशाली इंजिन आहे.
हेरॉन टीपी ड्रोन लेजर गाइडेड बॉम्ब आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाइल आहे. या ड्रोन विमानामध्ये सुमारे 1000 कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याचा वेग 220 नॉट्स आहे. यात अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी सिस्टम आणि जीपीएस प्रणाली आहे.
हेरॉन टीपी ड्रोन विमान कोणत्याही हवामान, पाऊस, थंडी, उष्णतेमध्ये कार्य करण्यास सक्षम आहे. देशाचे शत्रू आणि मित्र यांची ओळख पटण्यासाठी हायटेक तंत्रज्ञान समाविष्ट आहे. हेरॉन टीपी एकापेक्षा जास्त मोहिमा अगदी अचूक लक्ष्य भेदू शकते.
पहिल्यांदाच भारत हल्लेखोर ड्रोन विमान खरेदी करणार आहे ज्याचा वापर देशातंर्गत आणि पीओकेमधील दहशतवादविरोधी कारवाईत सहजपणे करता येईल. या ड्रोनमुळे डोंगरांवर स्थित दहशतवादी तळ नष्ट होऊ शकतात.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हेरॉन टीपी ड्रोनच्या समावेशानंतर एअरफोर्स लांबच्या पल्ल्यापर्यंत शत्रूला मारु शकते. अमेरिकेने जसे पाकिस्तानमधील अल कायदाचे अड्डे उद्ध्वस्त केले तसेच भारत दहशतवादी अड्डे नष्ट करू शकतात असं त्यांनी सांगितले आहे.
हेरॉन टीपी ड्रोनमुळे भारत कोणत्याही दहशतवादाचा पाठलाग करुन त्याला ठार करू शकेल. इराकच्या हद्दीत जाऊन अमेरिकेने इराणी सैन्य जनरल कासिम सुलेमानीला ज्या प्रकारे मारले त्याचप्रमाणेच करता येईल.
हेरॉन टीपी ड्रोनच्या समावेशामुळे भारत आक्रमण करणार्या ड्रोन्सचा वापर करणारे देशांच्या निवडक गटात सामील होईल. आतापर्यंत अमेरिका, इस्त्राईल, ब्रिटन, चीन सारखे मोजकेच देश सशस्त्र ड्रोन वापरतात.
चीन आपल्या ड्रोनची ताकद वेगाने वाढवत आहे. एवढेच नव्हे तर तो मित्र पाकिस्तानलाही ही ड्रोन विमाने निर्यात करीत आहे पण तज्ज्ञांच्या मते हेरॉनच्या क्षमतेपुढे चिनी ड्रोन कुठेच पुढे नाही.
पाकिस्तान आणि चीनच्या एकत्रित धोक्याचा सामना करण्यासाठी भारताला किमान 100 ड्रोन विमानांची आवश्यकता आहे. हा करार सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सचा असेल. भारत यापूर्वी अनेक इस्त्रायली ड्रोन विमाने वापरत आहे.