अजय वॉरियर -2020! दहशतवाद्यांशी लढण्यासाठी भारत अन् यूकेचं सैन्य सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 08:09 PM2020-02-18T20:09:21+5:302020-02-18T20:13:52+5:30

भारत आणि युनायटेड किंगडमच्या संयुक्त लष्करी सैन्य अभ्यासात गुरुवारपासून एकमेकांची कौशल्ये, अनुभव आणि तंत्रे यांची देवाणघेवाण सुरू झाली आहेत. यूकेमधील सॅलिसबरी मैदानावरील 72 तासाच्या या अभ्यासात दोन्ही देशांतील सैनिकांना युद्धाचे तंत्र शिकवण्यात येत आहे

तसेच दहशतवाद आणि अंतर्गत दंगलखोरांचा सामना करण्यासाठी ठोस रणनीती समजून देण्यात येईल. या संयुक्त अभ्यासाला ‘अजय वॉरियर -2020’ असं नाव देण्यात आलं आहे.

भारत आणि ब्रिटनच्या सैन्याने यापूर्वी 4 वेळा एकत्र सराव केला आहे. संयुक्त युद्ध सरावाचा हा पाचवा टप्पा आहे. गुरुवारी युद्धसराव सुरू होण्यापूर्वी युके सैन्याच्या 7 व्या इन्फंट्री ब्रिगेडचे ब्रिगेडियर टॉम बेविक यांनी भारतीय सैन्याचे स्वागत केले.

लष्कराच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, 72 तास चाललेल्या या अभ्यासात दोन्ही देशांचे सैनिक दहशतवाद्यांविरूद्ध काउंटर ऑपरेशनवर लक्ष केंद्रित करणार आहेत. सरावामध्ये, जवानांना काउंटर ऑपरेशन्स आणि बदला घेण्यासाठी संयुक्त व्याख्यान, प्रात्यक्षिक आणि ड्रिल घेण्यात येईल.

दोन्ही लोकशाही देशांच्या सैन्यांना एकत्र प्रशिक्षण देण्यासाठी आणि एकमेकांच्या कार्यक्षमतेचा, कार्याचा अनुभव मिळवण्यासाठी हा सराव एक उत्कृष्ट पाऊल असल्याचं सांगण्यात येतं.