'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स... By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 05:47 PM 2024-02-29T17:47:45+5:30 2024-02-29T18:09:46+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. Indian Defence Sector: गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील मित्र देशांनी जमिनी आणि हवेत मारा करणाऱ्या 'सुपरसॉनिक ब्राह्मोस' क्षेपणास्त्र खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. या क्षेपणास्त्राने 450 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील टार्गेट नष्ट करण्याची क्षमता आहे.
हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांमध्येही तैनात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, MENA मित्र देशांनी सुखोई-30 लढाऊ विमानांद्वारे हवेतून हवेत मारणाऱ्या आणि जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदीत स्वारस्य दाखवले आहे. याबाबत सरकारशी चर्चाही सुरू आहे.
या देशांच्या अधिकाऱ्यांनी ब्रह्मोस टीमचीही भेट घेतली आणि या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची क्षमता आणि सामर्थ्य जाणून घेतले. ब्राह्मोसला फिलिपाइन्समधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही क्षेपणास्त्रे तिथे आपली ताकद दाखवत आहेत. काही देशांना या क्षेपणास्त्राचे लँड ॲटॅक व्हर्जन खरेदी करायचे आहे. यावर सध्या विचार सुरू आहे.
ब्रह्मोस एअरोस्पेसचे अध्यक्ष अतुल डी राणे म्हणाले की, आम्ही या क्षेपणास्त्र प्रणालीच्या जास्तीत जास्त निर्यातीवर भर देत आहोत. लष्करी हार्डवेअर निर्यातीचा व्यवसाय 2025 पर्यंत 5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. भारतीय नौदलानेही अलीकडेच 19 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.
भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौकांमध्ये 200 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्याचे आदेश दिले आहेत. हे युद्धनौकांमध्ये जहाजविरोधी आणि जमिनीवर हल्ला करण्यासाठी बसवले जातील. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीनेही या कराराला हिरवा कंदील दिला आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र हवेत आपला मार्ग बदलण्यास आणि मुव्हींग(हलते) टार्गेट नष्ट करण्यात सक्षम आहे. याशिवाय, जमिनीपासून अवघ्या 10 मीटर उंचीवरही उड्डाण करू शकते. यामुळे शत्रूचे रडारदेखील या क्षेपणास्त्राला पाहू शकत नाहीत. विशेष म्हणजे, ब्रह्मोस क्षेपणास्त्र अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या दुप्पट वेगाने उडते. हे क्षेपणास्त्र 1200 युनिट ऊर्जा निर्माण करते, जे कोणतेही मोठे लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे चार प्रकार आहेत. पहिला – युद्धनौकेतून उड्डाण केले जाणारे अँटी-शिप व्हेरिएंट, दुसरे – युद्धनौकेवरून डागले जाणारे लँड अटॅक व्हेरिएंट. हे दोन्ही प्रकार भारतीय नौदलात आधीपासूनच कार्यरत आहेत. तिसरा- पाणबुडीतून उड्डाण घेणारे व्हर्जन. याची यशस्वी चाचणी झाली आहे. चौथा- पाणबुडीतून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र.
भारतीय नौदलाने राजपूत श्रेणीतील INS रणवीर आणि, INS रणविजयमध्ये 8 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवली आहेत. याशिवाय तलवार श्रेणीतील फ्रिगेट्स INS तेग, INS तरकश आणि INS त्रिकंडमध्येही प्रत्येकी 8 क्षेपणास्त्रे तैनात आहेत. याशिवाय, INS विशाखापट्टणमवर याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. लवकरच INS निलगिरीवरही हे क्षेपणास्त्र बसवले जाईल.