रेल्वे जनरल तिकिटांच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत, कोट्यवधी प्रवाशांवर होणार असा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:19 IST2025-03-06T17:13:07+5:302025-03-06T17:19:30+5:30

Indian Railway General Ticket Update: सणासुदीच्या दिवसांत रेल्वेला होणारी गर्दी ही आपल्याकडे सर्वसामान्य बाब आहे. त्यातही जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लक्षणीय असते. त्यामुळे कधीकधी चेंगराचेंगरीसारखे प्रकारही घडत असतात. गेल्या महिन्यात महाकुंभमेळ्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे दिल्लीतील एका रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जनरल डब्यामधीत गर्दीचं नियमन करण्यासाठी रेल्वेने जनरल तिकिटांमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू केली आहे.

सणासुदीच्या दिवसांत रेल्वेला होणारी गर्दी ही आपल्याकडे सर्वसामान्य बाब आहे. त्यातही जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लक्षणीय असते. त्यामुळे कधीकधी चेंगराचेंगरीसारखे प्रकारही घडत असतात. गेल्या महिन्यात महाकुंभमेळ्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे दिल्लीतील एका रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जनरल डब्यामधीत गर्दीचं नियमन करण्यासाठी रेल्वेने जनरल तिकिटांमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू केली आहे.

रेल्वेच्या इतर श्रेणीच्या डब्यांमधून प्रवास करण्यासाठी आधी आरक्षण करावं लागतं. मात्र ऐनवेळी प्रवासाचा बेत ठरल्यास तसेच आरक्षण न मिळाल्यास थेट स्टेशनवर तिकीट काढून जनरल डब्यातून प्रवास करता येतो. तसेच जनरलचं तिकीट हे बहुतांश वेळा त्या मार्गावरून जाणाऱ्या कुठल्याची गाडीच्या जनरल डब्यात चालतं. त्यासाठी आधीच आरक्षण करण्याची गरज भासत नाही.

मात्र आता रेल्वेकडून जनरल डब्याच्या तिकिटांसाठी असलेल्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यात येत आहेत. त्यामुळे आता जनरल डब्यामधून प्रवास करण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल होण्याची शक्यता आहे. जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी आणि मागच्या काही काळात झालेल्या दुर्घटना विचारात घेऊन रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी जनरल तिकीट व्यवस्थेबाबतत रेल्वेकडून समीक्षा करण्यात येत आहे.

जनरल तिकिटांच्या नियमांमध्ये बदल करून रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं आणि विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांना रोखण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी तिकीट तपासणी व्यवस्था अधिक अद्ययावत केली जाणार आहे. अशा परिस्थितीत रेल्वे दोन प्रमुख बदल करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची प्रवास करण्याची व्यवस्थाच पूर्णपणे बदलणार आहे.

सद्यस्थितीत जनरलची तिकीट खरेदी केल्यावर तुम्ही त्या मार्गावरून जाणाऱ्या कुठल्याही ट्रेनच्या जनरल डब्यामधून प्रवास करू शकता. मात्र नव्या नियमानुसार प्रत्येक जनरलचं तिकीट हे एका विशिष्ट्य ट्रेनसाठीच दिलं जाणार आहे. तसेच प्रवासी केवळ त्यांनी खरेदी केलेल्या तिकिटावर उल्लेख असलेल्या ट्रेनमधूनच प्रवास करू शकतील. त्यामुळे आता हा नियम लागू झाल्यास जनरलचं तिकीट काढल्यावर कुठल्याही ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. या नियमामुळे रेल्वेला गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासह प्रवाशांच्या संख्येचं व्यवस्थापन करण्यास मदत मिळणार आहे.

सद्यस्थितीत रेल्वेच्या नियमांनुसार जनरल तिकीटाची वैधता ही खरेदी केल्यापासून तीन तासांपर्यंत असते. अनेक प्रवाशांना याबाबत माहिती नसते. तसेच ते तिकिटाचा गैरवापर करतात. नव्या नियमानुसार हा नियम कठोरपणे लागू करण्यात येणार आहे. जर त्या प्रवाशाने तिकीट काढल्यापासून तीन तासांच्या आत प्रवास सुरू केला नाही तर ते तिकीट बाद ठरेल. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार आणि प्रवास न करता तिकीट बाळगण्याची सवय रोखता येणार आहे.

हे नवे नियम लागू झाल्यावर जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही बदलांचा सामना करावा लागणार आहे. आधी प्रवासी जनरल तिकिटासह कुठल्याही ट्रेनमधून प्रवास करू शकत असत. मात्र आता निश्चित ट्रेनमधूनच त्यांना प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रेन बदलून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याशिवाय नव्या नियमांतर्गत तिकीट तपासणी ही अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडणं अधिक सोपं होणार आहे.