लय भारी! रेल्वेनं केली नव्या व्यवसायाची तयारी; मागवाल त्या वस्तू स्वस्तात पोहोचवणार तुमच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:02 PM2022-02-15T14:02:55+5:302022-02-15T14:05:55+5:30

रेल्वे आता नव्या व्यवसायात; ई-कॉमर्स, कुरियर कंपन्याना देणार कडवी टक्कर

भारतीय रेल्वेनं नव्या व्यवसायात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी रेल्वे देशात असलेल्या आपल्या नेटवर्कचा वापर करणार आहे. त्यामुळे आता रेल्वेची स्पर्धा थेट कुरियर कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्यांशी असेल.

रेल्वेकडून सध्या डोअर-टू-डोअर डिलिव्हरी सर्व्हिस देण्याची तयारी सुरू आहे. इतर राज्य किंवा शहरातून मागवल्या जाणाऱ्या वस्तूंची डिलिव्हरी रेल्वेकडून करण्यात येईल. यासाठीचा वाहतूक खर्च कमी असेल.

सूरतहून साडी, मध्य प्रदेशहून गहू घरबसल्या मागवणं लवकरच शक्य होईल. विशेष म्हणजे यासाठी येणारा वाहतूक खर्च कमी असेल. कारण रेल्वे तुमच्याकडे हे सगळं सामान पोहोचवणार आहे. त्यासाठीची ट्रायल रेल्वेनं सुरुदेखील केली आहे.

देशातील लॉजिस्टिक मार्केटची वाढणारी व्याप्ती पाहता रेल्वेनंदेखील आता या व्यवसायात उतरण्याची तयारी केली आहे. रेल्वे अतिशय कमी दरात डोअर-टू-डोअर डिलिव्हरी सर्व्हिस सेवा देणार आहे. एखादी वस्तू मागवणाऱ्या वस्तूंसोबतच घाऊक प्रमाणात वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांनादेखील रेल्वेकडून सेवा पुरवली जाईल.

डोअर-टू-डोअर डिलिव्हरीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ऍपचा वापर करण्यात येईल. ग्राहकांना देण्यात आलेल्या पावतीवर असलेला क्यूआर कोड ऍपच्या मदतीनं स्कॅन करता येऊ शकेल. त्यामुळे पार्सलच्या लोकेशनची माहिती ग्राहकांना मिळेल. डिलिव्हरी किती वेळात मिळेल, त्यासाठी किती दिवस लागतील, याची माहिती ऍपवरूनच मिळेल.

डोअर-टू-डोअर डिलिव्हरी सर्व्हिसमध्ये रेल्वेची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. पार्सल घरापर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे काही घटकांची मदत घेईल. त्यांच्या मदतीनं रेल्वे एक मॉडेल तयार करेल.

येणाऱ्या जून-जुलैपर्यंत दिल्ली-एनसीआर आणि गुजरातच्या साणंद सेक्टरमध्ये या प्रकारची सेवा सर्वप्रथम सुरू होऊ शकते. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून इन-हाऊस ट्रायलदेखील झाल्या आहेत.

रेल्वेकडून देण्यात येणारी सुविधा दोन प्रकारची असेल. ग्राहक रेल्वेनं दिलेल्या पॉईंट्सवरून पार्सल घेऊ शकतात. यासोबतच थेट ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयातही पार्सल पोहोचवलं जाऊ शकतं. ग्राहक या दोनपैकी एक पर्याय निवडू शकतात.