Indian Railway news: बापरे! रेल्वेने सहा वर्षांत ७२००० नोकऱ्या कायमच्या संपवल्या, कोणत्या त्या पहा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:43 AM 2022-05-14T11:43:26+5:30 2022-05-14T12:00:11+5:30
Indian Railway Job Update: रेल्वे हे एवढे मोठे प्रस्थ आहे, की वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. याच रेल्वेने गेल्या सहा वर्षांत तब्बल ७२ हजार नोकरीच्या संधी कायमच्या संपविल्या आहेत. देशातील सर्वाधिक प्रवासी आणि मालवाहतूक एकटी रेल्वे करते. तसेच सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होण्याचे स्थानही भारतीय रेल्वेच आहे. भारतीय रेल्वे ३० हून अधिक क्षेत्रांत काम करते. यामुळे रेल्वेमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही काही लाखांत आहे. रेल्वे हे एवढे मोठे प्रस्थ आहे, की वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. याच रेल्वेने गेल्या सहा वर्षांत तब्बल ७२ हजार नोकरीच्या संधी कायमच्या संपविल्या आहेत.
यामध्ये शिपाई, वेटर, स्वीपर, माळी, शिक्षक आदी पदे आहेत. सरकारी कागदपत्रांनुसार रेल्वेच्या१६ झोनना 2015-16 ते 2020-21 या काळात 81,000 पदे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. ही पदे अनावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. कामाचे स्वरुप बदलले आहे तसेच तंत्रज्ञान आलेय यामुळे या कर्मचाऱ्यांची किंवा पदांची रेल्वेला आवश्यकता नाही, असे म्हटले होते. म्हणजेच या पदांवर यापुढे पुन्हा भरती केली जाणार नाही.
अशाप्रकारे झोननी 56,888 पदे सरेंडर केली आहेत. तर आणखी 15,495 पदे सरेंडर केली जाणार आहेत. उत्तर रेल्वेने 9,000 हून अधिक पदे रद्द केली आहेत. द. प. रेल्वेने 4,677 पदे रद्द केली आहेत. द. रेल्वेने 7524 पदे आणि प. रेल्वेने 5700 हून अधिक पदे सरेंडर केली आहेत. या आर्थिक वर्षात आणखी ९ ते १० हजार पदे रिक्त केली जाणार आहेत.
ही पदे रद्द करून आधीपासून असलेल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विभागात वर्ग केले जाणार आहे. तसेच यापुढे ही पदे भरली जाणार नाहीत. यामुळे रेल्वेचा कर्मचाऱ्यांचा पगार, भत्त्यांवरील होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. अशा अभ्यासाचा उद्देश उत्पादक नसलेल्या पदांची संख्या कमी करणे हा आहे.
पत्रे आणि कागदपत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारे लोक आम्हाला नको आहेत. आमचा भर यापुढे टेक्निकल लोकांवर जास्त असणार आहे, जे रेल्वेच्या विकासात आणि कामात योगदान देतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अलीकडच्या काळात रेल्वेत भरती कमी झाली आहे. कारण हे काम आउटसोर्स केले जात आहे. रेल्वेच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जातो. सध्या रेल्वेच्या कमाईपैकी निम्म्याहून अधिक रक्कम कर्मचाऱ्यांवर खर्च होते. रेल्वेच्या एक रुपयामागे कर्मचाऱ्यांच्या पगारात ३७ पैसे आणि पेन्शनमध्ये १६ पैसे खर्च होतात.
ऑपरेशन आणि मेंटेनन्स वगळता सर्व कामे आउटसोर्सिंगला देण्याची रेल्वेची तयारी आहे. स्वच्छता, बेडरोल आणि केटरिंगची कामे खासगी हातात देण्यात आली आहेत. भविष्यात तिकीट काढण्याचे कामही खासगी हातात जाऊ शकते.
राजधानी, शताब्दी, मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल-मेकॅनिकल तंत्रज्ञ, प्रशिक्षक सहाय्यक, रेल्वेतील सफाई कामगार आदी कामे कंत्राटावर देण्यात आली आहेत.