ही आहेत भारतातील अजब रेल्वेस्टेशन्स, कुठे जायला लागतो व्हिसा, तर काहींना नावच नाही By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:26 PM 2023-09-06T13:26:56+5:30 2023-09-06T13:31:31+5:30
Indian Railway: आजच्या घडीला भारतामध्ये सुमारे ७ हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत. यातील काही रेल्वेस्टेशन आपल्या नयनरम्य बांधकामासाठी ओळखली जातात. तर काही रेल्वेस्टेशन दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा रेल्वेस्टेशनची माहिती देणार आहोत. ज्यातील काही दोन राज्यांच्या सीमेवर आहेत तर काहींना नावच नाही आहे. आजच्या घडीला भारतामध्ये सुमारे ७ हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत. यातील काही रेल्वेस्टेशन आपल्या नयनरम्य बांधकामासाठी ओळखली जातात. तर काही रेल्वेस्टेशन दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा रेल्वेस्टेशनची माहिती देणार आहोत. ज्यातील काही दोन राज्यांच्या सीमेवर आहेत तर काहींना नावच नाही आहे.
भवानी मंडी रेल्वे स्टेशन भवानी मंडी रेल्वे स्टेशन दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर स्थित आहे. हे रेल्वे स्टेशन राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान विभागलेलं आहे. दोन वेगवेगळ्या राज्यात विभागलेलं असल्याने येथे थांबणाऱ्या ट्रेनचं इंजिन एका राज्यात तर डबे दुसऱ्या राज्यात थांबतात. या स्टेशनच्या एका बाजूला राजस्थानचा बोर्ड आहे. तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशचा बोर्ड आहे.
नवापूर रेल्वे स्टेशन नवापूर रेल्वे स्टेशनसुद्धा भारतातील अजब रेल्वेस्टेशनपैकी एक आहे. या स्टेशनचा एक भाग हा महाराष्ट्रामध्ये तर दुसरा भाग हा गुजरातमध्ये आहे. नवापूर स्टेशन दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे. इथे प्लॅटफॉर्मपासून बेंचपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात लिहिलेलं आहे. तसेच येथील उद्घोषणाही मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये केल जाते.
जर तुम्ही पंजाबमधील अटारी रेल्वे स्टेशनवर गेलात तर तिथे उतरण्यासाठी तुमच्याकडे व्हिसा असणं आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर स्थित असलेल्या अमृतसरमधील अटारी रेल्वे स्टेशनवर व्हिसाशिवाज जाण्यास सक्त मनाई आहे. या स्टेशनवर २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. तसेच व्हिसाशिवाय सापडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो. अशा व्यक्तीला शिक्षाही होऊ शकते.
झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथून टोरी येथे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या एका अज्ञात निवावी रेल्वे स्टेशनवरून जातात. येथे स्टेशनचं नाव दर्शवणारा कुठलाही साईनबोर्ड नाही आहे. २०११ मध्ये जेव्हा येथे पहिल्यांदा ट्रेनची ये जा सुरू झाली होती. तेव्हा या स्टेशनचं नाव बडकीचांपी असं ठेवण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र या नावाला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे या स्टेशनचं नामकरण करण्यात आलं नाही. तेव्हापासून हे स्टेशन निनावी आहे.
असंच एक स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. हे स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित झालेलं आहे. मात्र त्याला कुठलंही नाव देण्यात आलेलं नाही. पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यापासून ३५ किमी अंतरावर बांकुरा-मासग्राम रेल्वे लाइनवर या निनावी रेल्वेस्टेशनची निर्मिती २००८मध्ये झाली होती. सुरुवातीला या स्टेशनचं नाव रैनागड ठेवण्यात आलं होतं. मात्र स्थानिकांनी स्टेशनचं नाव बदलण्यासाठी मागणी केली होती. मात्र तेव्हापासून हे स्टेशन निनावी आहे.