अकरा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो ट्रेनचा हॉर्न; प्रत्येक हॉर्नमागे असतो 'हा' संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 09:53 PM2020-02-29T21:53:33+5:302020-02-29T22:09:37+5:30

ट्रेनचा हॉर्न आपल्या सर्वांच्याच चांगला परिचयाचा आहे. पण तुम्हाला माहीती आहे का की ट्रेनचे देखील तब्बद अकरा वेगवेगळ्या पद्धतीने हॉर्न वाजवण्याचा एक संकेत दडलेला आहे. रेल्वे इंजिनाचा चालक आणि ट्रेनच्या सर्वात शेवटच्या गार्ड बोगीमध्ये असलेल्या गार्डसह इतर रेल्वे कर्मचारी यांच्यामधली ही एक प्रकारची सांकेतिक भाषा आहे. अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचा अर्थ नेमका आहे तरी काय, हे नक्की जाणून घ्या.

ट्रेन चालकाने एकदाच अगदी काहीच सेकंद हॉर्न वाजविला, तर त्याचा अर्थ ट्रेन यार्डामध्ये जाण्यासाठी तयार आहे असा असतो.

काहीच सेकंदांसाठी पण दोनदा हॉर्न वाजविला गेला, तर चालक गार्डकडून ट्रेनचा प्रवास सुरु करण्यासाठी परवानगी मागत असल्याचा हा संकेत आहे.

ट्रेन चालत असताना चालकाने तीन वेळा हॉर्न वाजविल्यास इंजिनावरील चालकाचा ताबा सुटल्याचा हा धोक्याचा इशारा आहे. ट्रेनमध्ये असलेल्या गार्डने अशा वेळी त्याच्या बोगीमध्ये असलेल्या व्हॅक्यूम ब्रेक्सचा वापर करण्याविषयीची ही सूचना असते.

ट्रेन चालत असताना इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन ट्रेन थांबल्यास, किंवा कोणत्या दुर्घटनेमुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्यास याची सूचना चालक चार वेळा हॉर्न वाजवून देत असतो.

चालकाने जर एक दीर्घ हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजविला, तर गार्डने ट्रेन चालू लागण्याच्या आधी ब्रेक पाईप सिस्टम तपासून पाहण्याविषयीची ही सूचना असते.

ट्रेन चालकाने जर दोन वेळा दीर्घ आणि दोन वेळा लहान हॉर्न वाजविले, तर गार्डने त्वरित इंजिनमध्ये येण्यासाठीचा हा संकेत असतो.

ट्रेन चालकाने सतत दीर्घ हॉर्न अनेकवेळा वाजविल्यास ट्रेन पुढल्या स्टेशनवर न थांबता पुढे निघून जाणार असल्याचा हा संकेत असतो.

ट्रेन चालकाने काही सेकंदांच्या अंतराने पुन्हा पुन्हा दीर्घ हॉर्न वाजविल्यास हा संकेत पुढे एखादे रेल्वे क्रॉसिंग आहे असे सूचित करणारा असतो.

चालकाने एक दीर्घ आणि एक छोटा हॉर्न वाजविला तर ट्रेनचे रूळ पुढे विभाजित होत असल्याचा हा संकेत असतो

ट्रेन चालकाने दोन छोटे आणि एक दीर्घ हॉर्न वाजविल्यास प्रवाश्यांपैकी कोणी तरी आपात्कालीन साखळी ओढली असल्याचा, किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक्स लावल्याचा हा संकेत असतो.

ट्रेनच्या चालकाला मार्गामध्ये मोठा धोका समोर दिसत असल्यास सतत सहा वेळा हॉर्न वाजवून चालक याची सूचना देत असतो.