रेल्वेचा दणका; प्लॅटफॉर्म तिकीट दरात तीन पटीने वाढ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 09:54 AM 2021-03-05T09:54:37+5:30 2021-03-05T10:02:58+5:30
Platform Ticket Hike : रेल्वे प्रशासनाकडून या तिकीटाच्या दरात तीन पटीने वाढ केली आहे. नवी दिल्ली : कोरोना संकट काळात ठप्प झालेली प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा आता पुन्हा राजधानी दिल्लीतील प्रमुख स्टेशनवर सुरु झाली आहे. रात्रीपासून ही सुविधा सुरु केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या तिकीटाच्या दरात तीन पटीने वाढ केली आहे.
आधी प्लॅटफॉर्म तिकीटासाठी लोकांना १० रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, आता ३० रुपये द्यावे लागणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अनेक रेल्वे व्यवस्था अद्याप पूर्णपणे पूर्ववत झाली नाही.
रेल्वे स्थानकांवर एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी त्यांचे नातेवाईक त्यांना सोडण्यासाठी येत असतात, या नातेवाईकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटे घेणे बंधनकारक आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एक वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटांची सुविधा बंद करण्यात आली होती. कारण, फक्त रेल्वेचा प्रवास करायचा आहे, त्या प्रवाशालाच रेल्वे स्टेशनला येता येईल आणि स्टेशनवर इतरांची जास्त गर्दी होणार नाही.
दिल्लीच नाही तर मुंबईमध्येही प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्यात आले आहे. याठिकाणी पाच पटीने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनच्या काही प्रमुख स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट वाढविले आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर ५० रुपये करण्यात आली आहे. यातबरोबर, लोकल भाड्यातही वाढ करण्यात आली आहे.
रेल्वेकडून पॅसेंजर ट्रेनच्या ऐवजी एक्स्प्रेस ट्रेनची सेवा सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनचे प्रवासी भाडेही वाढण्यात आले आहे. प्रवाशांना १० ऐवजी ३० रुपये देऊन लोकल प्रवास करावा लागणार आहे.
जर तुम्हाला दिल्ली ते गाझियाबादचा प्रवास करायचा असेल, तर आता १० रुपयांऐवजी ३० रुपये द्यावे लागणार आहे. दरम्यान, कोरोना काळात रेल्वेची सेवा सुरु झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी प्रवासी भाडे वाढविण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
बुधवारी रात्री उशिरा राजधानी दिल्लीत अनेक रेल्वे स्टेशनवर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडे वाढ करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्म तिकिट घेण्यासाठी पोहोचलेल्या नवी दिल्ली स्टेशनवरील लोकांचे म्हणणे आहे की, प्लॅटफॉर्म तिकीटाचा खिसावर परिणाम होत आहे. तर काही प्रवाशांनी सांगितले की, या निर्णयामुळे सरकारच्या महसूलात वाढ होईल आणि रेल्वेकडून अधिक सुविधा मिळतील.