ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 23 - हुगली नदीखाली सुरु असलेलं बोगद्याचं काम पुर्ण झालं असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावताना दिसणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे. (लवकरच दिसणार नदीखालून धावणारी मेट्रो) कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचं बंधकाम केलं आहे. ""या कामगिरीसोबतच भारत काही ठराविक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेलं हे दुसरं महत्वाचं यश आहे. कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या टीमने ज्यामध्ये परदेशातील अभियंत्यांचाही समावेश आहे, त्यांनी हे अंडरवॉटर टनलचं काम पुर्ण केलं आहे"", अशी माहिती कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार यांनी दिली आहे. हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी 80 किमी असेल. या मार्गावर मेट्रो 10.6 किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी 520 मीटर इतकी आहे. नदीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्यासाठी 60 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर पुर्व - पश्चिम मेट्रो प्रोजेक्टसाठी एकूण नऊ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याचं काम गतवर्षी एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आलं होतं. पुर्व - पश्चिम मेट्रो 2019 पर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे. अधिका-याने सांगितल्यानंतर तात्काळ सेवेसाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी पर्यायी मार्ग म्हणून मेट्रोचा वापर करता येऊ शकतो.