समाजभान! हे आहेत देशातील टॉप-१० दानशूर व्यक्ती, शिव नाडर यांनी दर दिवासाला दान केले ३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:21 PM2022-10-20T19:21:16+5:302022-10-20T19:31:41+5:30

प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं असतं की श्रीमंत लोक इतके कमावतात, मग ते दान देखील करतात का? आपल्या धर्मग्रंथात दानाचे खूप महत्त्व सांगितले आहे. इतर धर्मातही त्याची व्याख्या आणि दान करण्याचा सल्ला दिसून येतो. अशा परिस्थितीत कोण किती देणगी देते हे जाणून घेणे मनोरंजक आहे.

EdelGive Hurun India Generics List 2022 मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ७७ वर्षीय शिव नाडर यांनी दररोज ३ कोटी रुपयांची देणगी देऊन 'भारतातील सर्वात दानशूर' व्यक्तीचा किताब मिळवला आहे. विप्रोचे ७७ वर्षीय अझीम प्रेमजी गेल्या दोन वर्षांपासून अव्वल स्थानावर राहिल्यानंतर यावर्षी त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांनी वार्षिक 484 कोटी रुपयांची देणगी दिली.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ६० वर्षीय गौतम अदानी या यादीत सातव्या स्थानावर आहेत. त्यांनी १९० कोटी रुपयांची देणगी दिली. भारतातील एकूण १५ व्यक्तींनी वार्षिक १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली. त्यानंतर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्यांमध्ये २० व्यक्ती आहेत. तर ४३ व्यक्तींनी वर्षभरात २० कोटींपेक्षा जास्त दान केलं आहे.

लार्सन अँड टुब्रोचे समूह अध्यक्ष ए एम नाईक यांनी 142 कोटी रुपयांची देणगी दिली आणि ते देशातील सर्वात उदार व्यावसायिक व्यवस्थापक आहेत. झिरोधाचे नितीन कामत आणि निखिल कामत यांनी देणगी 300 टक्क्यांनी वाढवून 100 कोटी रुपये केली आहे.

माइंडट्रीचे सह-संस्थापक सुब्रतो बागची आणि एनएस पार्थसारथी यांचाही टॉप-10 देणगीदारांमध्ये समावेश आहे. यापैकी प्रत्येकाने २१३ कोटी रुपयांची देणगी दिली. Ques कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अजित इसाक यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) ला १०५ कोटी रुपये दान केले. देणगीदारांच्या यादीत ते 12 व्या क्रमांकावर आहेत. इंडिगो एअरलाइन्सचे सह-प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी आयआयटी, कानपूरला 100 कोटी रुपयांची देणगी दिली. गेल्या पाच वर्षांत १०० कोटींहून अधिक देणगी देणाऱ्यांची संख्या दोनवरून १५ झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

इन्फोसिसचे नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन आणि एसडी शिबुलाल यांनी अनुक्रमे ९व्या, १६व्या आणि २८व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अनुक्रेम १५९ कोटी, ९० कोटी आणि ३५ कोटी रुपयांची देणगी दिली. या वर्षी या यादीत १९ नवीन नावे जोडली गेली, ज्यांनी एकूण ८३२ कोटी रुपयांची देणगी दिली. या वर्षीच्या यादीत सहा महिलांचा समावेश आहे आणि १२० कोटी रुपयांच्या देणगीसह ६३ वर्षीय रोहिणी नीलेकणी या देशातील सर्वात दानशूर महिला ठरल्या आहेत.

शिव नाडर अँड फॅमिली ११६१ कोटी (आर्ट्स आणि कल्चर), अजीम प्रेमजी अँड फॅमिली- ४८४ कोटी (शिक्षण), मुकेश अंबानी अँड फॅमिली- ४११ कोटी (शिक्षण), कुमार मंगलम बिरला अँड फॅमिली- २४२ कोटी (शिक्षण), सुष्मिता अँड सुब्रतो बागची- २१३ कोटी (हेल्थकेअर)

राधा अँड एनएस पार्थसारथी- २१३ कोटी (हेल्थकेअर), गौतम अदानी अँड फॅमिली- १९० कोटी (शिक्षण), अनिल अग्रवाल अँड फॅमिली- १६५ कोटी (कोविड-१९), नंदन निलकेणी- १५९ कोटी (सोशल थिकिंग), एएम नाईक- १४२ कोटी (हेल्थकेअर)