भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:15 PM2020-06-16T19:15:39+5:302020-06-16T19:35:56+5:30

भारत-चीन सीमेवर कितीही तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार होत नाही. त्यासाठी एक करार कारणीभूत आहे.

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीमुळे दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

या झटापटीत भारताचे तीन तर चीनच्या पाच सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सीमेवर कितीही तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार होत नाही. त्यासाठी एक करार कारणीभूत आहे. हा करार १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या चीन दौऱ्यादरम्यान हा करार झाला होता. जाणून घेऊया या करारात नेमक्या काय आहेत तरतुदी.

भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा तीन हजार ४८८ किमी लांब आहे. मात्र ही सीमारेषा २ हजार किमी लांब असल्याचा चीनचा दावा आहे. दरम्यान, १९९१ मध्ये चीनचे पंतप्रधान ली पेंग भारत दौऱ्यावर आले असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी ली यांच्यासोबत एलएसीवर शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी चर्चा केली होती.

त्यानंतर नरसिंहराव हे १९९३ मध्ये चीनच्या दौऱ्यावर गेले असताना एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कराराच्या नऊ मुद्द्यांवर एकमत झाले. यातील आठ तरतुदी खूप महत्त्वपूर्ण होत्या. या करारावर भारताचे तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री आर. एल. भाटिया आणि चीनचे तत्कालीन उपपरराष्ट्रमंत्री तांग जियाशुआन यांनी सह्या केल्या होत्या.

या करारामधील मुख्य तरतूद म्हणजे भारत आणि चीनमधील सीमाप्रश्न शांततामय पद्धतीने सोडवण्यावर भर दिला जाईल. तसेच एकमेकांविरोधात सैनिकी कारवाईची धमकी दिली जाणार नाही. तसेच दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पुढे येणार नाही. जर तसे झाले तर दुसरीकडून संकेत मिळाल्यानंतर परत माघारी येईल.

दोन्ही देशांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित राहावेत यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देश कमीत कमी सैन्यबल ठेवतील. सैन्याची संख्या, मर्यादा आदी माहितीची एकमेकांशी देवाण घेवाण करतील.

या करारानुसार दोन्ही देश विश्वास प्रस्थापित करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात काम करतील. सहमतीने निर्धारित केलेल्या क्षेत्रात कुणीही सैन्य स्तरावरील काम करणार नाही. तसेच दोन्ही देश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील विविध स्तरावरील सैनिकी कवायतींची पूर्वसूचना देतील.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्हीकडून हवाई घुसखोरी होऊ नये यासाठी दोन्ही देशांचे हवाई दल सीमा ओलांडणार नाहीत. तसेच एलएसीजवळील भागात हवाई अभ्यासाबाबत निर्बंधांबाबत विचार करतील.

१९९३ मधील या करारानुसार सीमेबाबतच्या प्रश्नांसाठी दोन्ही देशांकडून एक जॉईंट वर्किंग ग्रुप बनवण्यात येईल. ज्यामध्ये मुत्सद्दी आणि सैनिकी तज्ज्ञ असतील, परस्पर सल्ल्याने असा गट स्थापन होईल.

मात्रा अशा अनेक तरतुदी असतानाही आज सीमेवर जवानांना वीरमरण आले आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत अधिकारी आणि अन्य दोन जवानांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले आहे. दरम्यान, तणाव निवळण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी बैठक घेत आहेत.