Indo-Pak War 1971: भारताचा खरा मित्र कोण? अमेरिका की रशिया; 1971 च्या युद्धातील ही घटना सांगेल By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:05 PM 2021-12-16T16:05:46+5:30 2021-12-16T16:18:02+5:30
971 War: How Russia sank Nixon’s gunboat diplomacy 14 डिसेंबरला पाकिस्तानी जनरल ए. ए. के. नियाजी यांनी ढाक्यामध्ये अमेरिकी काऊन्सिल जनरलसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते. हा संदेश थेट अमेरिकेला पाठविण्यात आला. पण... भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध केले आणि आजच्या दिवशी 50 वर्षांपूर्वी बांगलादेशला पाकिस्तानपासून तोडले. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय जवानांसमोर आत्मसमर्पण केले. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर आजवरचे सर्वात मोठे आत्मसमर्पण मानले जाते. परंतू एक वेळ अशी आलेली की याचा निकाल कदाचित भारताविरोधातही लागला असता, पण रशियाने मोठी मदत केली आणि अरिष्ट टळले.
पाकिस्तानने केवळ 13 दिवसांत हार मानली होती. एक वेळ अशी आली की अमेरिका पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिका भारतावर चाल करून आला होता. अमेरिका आणि भारताचा दोस्ताना जगात खूप चर्चिला जातो. भारतात गुंतवणूक करणारा अमेरिका सर्वात मोठा देश आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने भारताला लाखो कोटींची युद्धसामुग्री विकली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान चांगले संबंध आहेत. पण याच अमेरिकेने एकेकाळी भारतावर हल्ल्याचे आदेश दिले होते.
अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी जपानमध्ये असलेल्या युद्धानौकांचा सातवा ताफा भारताच्या दिशेने पाठविला होता. अमेरिकेची जहाजे बंगालच्या उपसागराकडे कूच करत होती, तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी तसे आदेश दिले होते. अमेरिकेने पाकिस्तानला तेव्हा अत्याधुनिक हत्यारे दिली होती.
पाकिस्तानची पाणबुडी पीएनएस गाझीदेखील अमेरिकेनेच बांधली होती. भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला उद्ध्वस्त करण्यासाठी गाझीला पाकिस्तानने पाठविले होते. परंतू, भारतीय नौदलाने अत्यंत चपळाईने गाझीला विशाखापट्टनमच्या समुद्रात बुडविले होते.
जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात युएसएस एंटरप्राईस नावाची एक तेव्हाची सर्वात खतरनाक युद्धनौका होती, जिच्यावर अण्वस्त्रवाहू विमाने तैनात होती. याचबरोबर अन्य युद्धनौका होत्या. हा ताफा एवढा शक्तीशाली होता की एकदा इंधन भरले की जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर न थांबता जाऊ शकत होता.
विक्रांतच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त शक्तीशाली होता. अमेरिकेने या पावलामागे बांगलादेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कारण जरी दिले असले तरी त्यामागचे इप्सित वेगळेच होते, जे कदापीही पूर्ण झाले नाही.
रशियाने कशी केली मदत... अमेरिकेच्या युद्धनौका भारताच्या दिशेने निघाल्याचे कळताच रशियाने सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. तत्कालीन सोव्हिएत संघ असल्याने जगभरात तसा दबदबाही होता. 1971 चे युद्ध सुरु होण्याआधी अवघे काही महिने भारताने रशियाशी शांती, मैत्री आणि सहकार्याचा करार केला होता.
रशियाने तातडीने युएनकडे मदत मागितली आणि आपली आण्विक पानबुडी, विध्वंसक युद्धानौकांचा मोठा ताफा प्रशांत महासागरातून हिंदी महासागरात पाठविला. यामुळे अमेरिका हबकला, अमेरिकेची जहाजे बंगालच्या खाडीत पोहोचण्याआधीच पाकिस्तानने गुडघे टेकले. परंतू रशियाने अमेरिकेच्या जहाजांचा पाठलाग सुरु केला आणि जोवर ते भारतापासून दूर जात नाहीत तोवर त्यांच्या मागावर राहिले.
युएनने केली भारताचीच मदत... रशियाने युएनमध्ये भारताला मदत करण्यासाठी दबाव वाढविला. या युद्धावेळी अमेरिकेसह अन्य देश पाकिस्तानच्या समर्थनात उभे ठाकले. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांत युद्ध थांबविण्याचा प्रस्ताव आणून पाकिस्तानची मदत करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, रशियाने या प्रस्तावर विटो आणत भारताची मदत केली होती.
2011 मध्ये अमेरिकेचा बुरखा फाटला 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु होते. यावेळी अमेरिकेच्या सरकारने त्यांच्या सैन्याला भारतावर हल्ल्याचे आदेश दिले होते. 2011 मध्ये समोर आलेल्या युद्धाच्या गोपनिय कागदपत्रांमुळे अमेरिकेची धोकेबाजी उघड झाली होती. मात्र, तोपर्यंत भारताला एवढेच माहिती होते, की बंगालच्या खाडीमध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी नौदलाची सातवी तुकडी रवाना केली होती.
या युद्धनौकांमध्ये अमेरिकी सैनिक भरलेले होते. त्यांना भारतावर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. या युद्धाने बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. पण त्यासाठी भारताला मोठी जोखिम उचलावी लागली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशला पाकिस्तानपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. हे समजताच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारताला धडा शिकविण्याची पूर्ण तयारी केली होती.
हवाई हल्ल्यांचे आदेश भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने नौसेनेच्या तीन बटालियनना हल्ल्याच्या तयारीचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस एंटरप्राईजला भारतीय शहरांवर हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही पुरविण्यात येत होती.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या 6 पानांच्या या कागदपत्रांमध्ये 1971 च्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या चालबाजीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना थेट जबाबदार म्हटले आहे. यूएसएस एंटरप्रायझेसकडे तैनाच बॉम्बर फोर्सला अमेरिकेच्या अध्यक्षांचे भारतावर हल्ला करण्याचे थेट आदेश होते. भारताला हल्लेखोर म्हणून बदनाम करणे आणि बंगालच्या खाडीमध्ये नौदलाला पाठविण्याचा निर्णय निक्सन यांचाच होता, असा उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे.
ते दोन दिवस महत्वाचे होते... 14 डिसेंबरला पाकिस्तानी जनरल ए. ए. के. नियाजी यांनी ढाक्यामध्ये अमेरिकी काऊन्सिल जनरलसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे म्हटले होते. हा संदेश थेट अमेरिकेला पाठविण्यात आला. मात्र, यानंतर 19 तासांनी भारताला याबाबत कळविण्यात आले. एवढ्या वेळामध्ये अमेरिका भारतावर हल्ला करण्याचा विचार करत होता, असे भारतीय कुटनीती तज्ज्ञांनी या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.