INS Vikrant : पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका समुद्रात चाचणीसाठी उतरली, जाणून घ्या तिची ताकद! By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:21 PM 2021-08-05T22:21:29+5:30 2021-08-06T16:04:33+5:30
INS Vikrant : स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘INS Vikrant’च्या अंतिम टप्प्यातील सागरी चाचण्यांना अखेर सुरूवात झाली आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ‘INS Vikrant’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. काही महिने आधीच या चाचण्या सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेचा हा कार्यक्रम निश्चित वेळापत्रकाच्या मागे सुरू आहे. पण ‘आयएनएस विक्रांत’च्या सागरी चाचण्यांना सुरूवात होणे ऐतिहासिक व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना ठरते. (All Photos - PTI/Getty)
कारण या सागरी चाचण्या सुरू झाल्याबरोबर भारत स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक युद्धनौका असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये सामील झाला आहे. ‘आयएनएस विक्रांत’ ही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाचे प्रतिबिंब असल्याचे बंदर, नौकावहन आणि जलवाहतूकमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.
‘INS Vikrant’ बहुप्रतिक्षित चाचण्यांना बुधवारी सुरूवात झाल्याची माहिती केंद्रीयमंत्री सोनोवाल यांनी दिली. कोचीन शिपयार्डमध्ये उभारणी करण्यात आलेल्या या विमानवाहू युद्धनौकेच्या उभारणीचा कार्यक्रम २००९ साली सुरू झाला होता.
देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विमानवाहू नौकेच्या आकाराच्या जहाजाचे संपूर्ण त्रिमितीय मॉडेल आधी तयार करण्यात आले.
त्यानंतर या मॉडेलच्या आधाराने निर्मिती संबंधित आराखडा तयार करण्यात आला. या विमानवाहू युद्धनौकेचा आराखडा, रचना ही सर्व भारतीय बनावटीची आहे.
२०१३ साली ही युद्धनौका बांधून पूर्ण झाली व तीचे जलावतरण झाले होते. तसेच ‘INS Vikrant’वर बसविण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे स्वदेशी आहेत. ४० हजार टन वजनाची ही विमानवाहू युद्धनौका २६२ मीटर लांब आणि ६२ मीटर रुंद आहे.
३० लढाऊ विमान व हेलिकॉप्टर्स राहू शकतात. युद्धनौकेवर विमानांच्या संचलनासाठी असलेल्या तळाचे क्षेत्रफळ तब्बल दोन फुटबॉल मैदानांच्या एकत्र क्षेत्रफळा इतके आहे.
‘INS Vikrant’च्या उभारणीसाठी विशेष पोलादाची निर्मिती स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (सेल) केली आहे. तसेच या युद्धनौकेवर २१०० किलोमीटर लांब इलेक्ट्रिक केबल बसविण्यात आली असून या विमानवाहू युद्धनौकेच्या उभारणीसाठी व यावर उपकरणे बसविण्यासाठी गेल्या बारा वर्षांपासून दोन हजार अभियंते, तंत्रज्ञ आणि कार्मचारी रात्रंदिवस काम करीत होते.
१९७१च्या पाकिस्तानविरोधात युद्धात अतुलनीय कामगिरी करणार्या ‘आयएनएस विक्रांत’च्याच नावाने या भारतीय बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.
सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका असून आयएनएस विक्रांतच्या सागरी चाचण्या पूर्ण होऊन ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यावर नौदलाकडे दोन विमानवाहू युद्धनौका कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.
सागरी चाचण्यांदरम्यान विक्रांतवरील दिशादर्शक यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि मुख्य उपकरणांच्या चाचण्यांसह या युद्धनौकेला सागरात वावरताना आवश्यक यंत्रणेच्या देखील कठोर चाचण्या पार पडतील.
याआधी कोचिन शिपयार्डमध्ये सर्व उपकरणांच्या व विक्रांतवरील उपकरणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आता या चाचण्या प्रत्यक्ष सागरात पार पडणार आहेत.
‘आयएनएस विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी कोरोनाच्या संकटातही ‘आयएनएस विक्रांत’च्या चाचण्या सुरू केल्याबद्दल कोचिन शिपयार्डचे कौतूक केले असून या चाचण्या महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.