Abhilasha Barak: वय वर्षे २६, उभे आयुष्य सैन्यासोबतच वावरली; देशाची पहिली वहिली महिला लढाऊ पायलट बनली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:09 AM2022-05-27T11:09:56+5:302022-05-27T11:14:14+5:30

Abhilasha Barak combat aviator: हरियाणाच्या पंचकुलाची राहणारी तरुणी भारतीय सैन्याची नवी ओळख बनली आहे.

हरियाणाच्या पंचकुलाची राहणारी तरुणी भारतीय सैन्याची नवी ओळख बनली आहे. 26 वर्षीय अभिलाषा बराक ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ पायलट (कॉम्बॅट एव्हिएटर) बनली आहे. महत्वाची बाब म्हणजे तिचे बालपण सैन्याच्या छावण्यांमध्ये गेले आहे. कोण आहे ही अभिलाषा जिने हा विक्रम नोंदविला आहे.

अभिलाषाचे वडील कर्नल ओम सिंह बराक हे सैन्यात अधिकारी होते. अभिलाषाचे शिक्षण, पालन पोषन सारे सैन्याच्या छावण्यांमध्येच झाले. सुरुवातीपासूनच अभिलाषाला रोमांचक जीवनाचा शौक होता. धाडसी असल्याने तिने हवाई दलात जाण्याचा निर्णय घेतला.

अभिलाषाचा जन्म जन्म तामिळनाडूतील उटीजवळील बिलगिंटन निलगिरीस येथे झाला. वडील लष्करी अधिकारी असल्याने बराचसा वेळ लष्करी छावणी परिसरात जात असे. सनवर कसौली (हिमाचल प्रदेश) येथील एका खासगी शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने दिल्लीतून बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केले, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

शालेय शिक्षणाच्या काळातही घोडेस्वारी, शिबिरात जाणे, खेळात भाग घेणे असे ती करत असे. ओम सिंह हे 2011 मध्ये निवृत्त झाले. 2013 मध्ये IMA मध्ये भावाची पासिंग आऊट परेड होती, ती पाहण्यासाठी अभिलाषा गेली होती. तिथेच तिने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.

अभिलाषाने दोनदा हवाई दलात भरतीसाठी प्रयत्न केले. परंतू तिच्या उंचीमुळे तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र, तिने परीक्षा पास केल्या होत्या. 2018 मध्ये ओटीए, चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची निवड केली.

परंतू पुन्हा नियम आडवे आले. तेव्हा महिलांना विमान उड्डाण करण्याची परवानगी नव्हती. दोन वर्षांनी महिलांना पायलट म्हणून परवानगी देण्यात आली आणि तिच्या स्वप्नांना बळ मिळाले. अभिलाषासह १५ तरुणींनी यासाठी अर्ज केला. त्यापैकी दोघींची निवड झाली. पुढच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये दुसरी तरुणी बाहेर पडली आणि अभिलाषाच एकटी यशस्वी झाली.

अभिलाषाच्या या दैदीप्यमान कामगिरीने राज्यातील आणि देशातील मुलींना यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. संपूर्ण राज्याला अभिमान आहे, अशा शब्दांत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी स्तुती केली आहे.