वर्षभरात 'या' चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:18 PM2018-12-18T18:18:57+5:302018-12-18T18:38:15+5:30

'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई चक्रीवादळ' निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना बसला आहे. 2018 या वर्षात काही चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला त्या चक्रीवादळांबाबत जाणून घेऊया.

विशाखपट्टणममध्ये 'फेथाई' या चक्रीवादळामुळे अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर विजयवाडा शहरात भूस्खलन झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 11,000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

'फेथाई' चक्रीवादळामुळे संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 22 रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त काही ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच ओडिशाच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते.

गुरुवारी (15 नोव्हेंबर) कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकले. याच पार्श्वभूमीवर काही दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. तसेच भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.

किनारपट्टी भागातील 76 हजार 290 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली होती. प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्याने 'तितली' या चक्रीवादळाने प्रचंड स्वरूप धारण केले होते. या चक्रीवादळामध्ये 55 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते.

गुरुवारी (11 ऑक्टोबर) तितली चक्रीवादळ हे ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. त्यानंतर या संपूर्ण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता.

चक्रीवादळामुळे काही दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना घरे तातडीने रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील गंजम जिल्ह्यातील गोपालपूर येथे 'डेई' हे चक्रीवादळ धडकले होते. त्याच्या तडाख्यामुळे राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच मलकानगिरी जिल्ह्याचा इतर भागांशी संपर्क तुटला होता.

2017 मध्ये भारताच्या दक्षिण किनारपट्टीला 'ओखी' या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. ओखी चक्रीवादळात काही जणांना मृत्यू झाला होता. तसेच चेन्नई, कन्याकुमारी, तुतीकोरीन, कांचीपूरम, विल्लुपुरम, मदुराई, थनजावूर आणि थिरूवरूरमधील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली होती.

वादळ आणि पावसामुळे तामिळनाडू व केरळमधील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. वादळाचा तडाखा बसलेल्या भागातील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. वादळाचा जोर ओसरल्यानंतर बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश एनडीआरएफ तसेच इतर आपातकालीन यंत्रणांना देण्यात आले होते.

निशा, नीलम, वरदाह, फेलिन आणि बुलबुल या चक्रीवादळाचाही याआधी कहर पाहायला मिळाला होता.