UPSC साठी नोकरी सोडली, 5 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; झाली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:56 IST2023-09-26T17:44:45+5:302023-09-26T17:56:27+5:30

दिल्लीची रहिवासी असलेली नमिता यूपीएससी परीक्षेत एकदा नाही तर पाच वेळा नापास झाली पण तिने हार मानली नाही. शेवटी ती यशस्वी झाली.

UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवणं सोपं नाही. वर्षानुवर्षे मेहनत करूनही यश मिळत नाही. यामुळे, कधीकधी लोकांमध्ये निराशा देखील वाढते, तरीही काही लोक असे आहेत जे अपयशामुळे निराश होत नाहीत. तर जिद्दीने पुन्हा प्रयत्न करून घवघवीत यश संपादन करतात.

एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. पराभव हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि मग तयारीला सुरुवात केली. यानंतर यश मिळवलं. दिल्लीची रहिवासी असलेली नमिता यूपीएससी परीक्षेत एकदा नाही तर पाच वेळा नापास झाली पण तिने हार मानली नाही. शेवटी ती यशस्वी झाली.

नमिता शर्मा ही राजधानी दिल्लीची आहे. येथूनच तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने येथील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले.

बीटेक केल्यानंतर नमिताला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही लागली. तिने दोन वर्षे काम केलं पण या काळात तिचं मन दुसरीकडेच होतं.

यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याचं स्वप्न होतं. नमिताने नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची मनापासून तयारी करणारी नमिता शर्मा पहिल्यांदाच परीक्षेला बसली तेव्हा ती नापास झाली होती. यानंतर तिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्यांदा प्रयत्न करूनही ती प्रीलिम्समधून बाहेर पडली.

नमिता शर्माने पाचवा प्रयत्न केला. यावेळीही तिला यश मिळू शकलं नाही. यानंतरही तिने प्रयत्न सुरूच ठेवले आणि पुन्हा परीक्षा दिली. शेवटी नमिताच्या मेहनतीला फळ मिळाले.

सहाव्या प्रयत्नात नमिताने नागरी सेवा परीक्षेचे प्रीलिम्स, मुख्य आणि मुलाखत हे सर्व टप्पे पार केले होते. यावेळी तिची रँक 145 होती. यानंतर तिची आयआरएस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.