झेप! १९ उपग्रहांची; मोदींची प्रतिमा आणि ई-भगवद्गीतेचाही समावेश, इस्रोची नववर्षातील चमकदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:44 AM2021-03-01T06:44:04+5:302021-03-01T07:08:10+5:30

ISRO to launch 19 satellites : इस्रोने रविवारी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे (पीएसएलव्ही) १९ उपग्रह अवकाशात सोडले.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इस्रोने रविवारी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे (पीएसएलव्ही) १९ उपग्रह अवकाशात सोडले. त्यात १३ अमेरिकी उपग्रहांचा समावेश असून ॲमेझोनिया-१ या ब्राझिलियन उपग्रहाचे लाँचिंगही यावेळी करण्यात आले.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून ‘पीएसएलव्ही सी-५१’ या प्रक्षेपण यानातून उपग्रह अंतराळात सोडण्यात आले.

उपग्रहाच्या वरच्या पॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र कोरले आहे तर इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांचीही नावे तळावरील पॅनेलवर कोरण्यात आली आहेत. तसेच, उपग्रहामध्ये भगवद्‌गीतेचीही प्रत एसडी कार्डच्या स्वरुपात पाठविण्यात आली आहे

रविवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी ‘पीएसएलव्ही सी-५१’ या प्रक्षेपण यानातून उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. या प्रक्षेपणासाठी १ तास ५५ मिनीट ७ सेकंद इतका कालावधी लागला.

एकूण १९ उपग्रह सोडण्यात आले. त्यात अमेरिकेच्या १३ उपग्रहांचा समावेश आहे. शिवाय ब्राझीलचा ॲमेझोनिया-१ हा उपग्रह आहे. चेन्नईच्या ‘स्पेस किड्झ इंडिया’च्या ‘सतीश धवन’ उपग्रहाचाही यात समावेश आहे.

‘सतीश धवन’ हा एक नॅनो सॅटेलाइट असून अंतराळातील किरणोत्सर्ग आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास त्यातून करण्यात येणार आहे.

६७३ किलोग्रॅम वजनाच्या ॲमेझोनिया-१च्या मदतीने ॲमेझॉनच्या परिसरातील जंगलतोड आणि ब्राझीलमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्सना रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करता येऊ शकेल.

जेपीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (श्रीपेराम्बुदुर), जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (नागपूर) आणि श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोईमतूर).

इस्रोच्या ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ (एनएसआयएल) या व्यावसायिक शाखेसाठी हे प्रक्षेपण महत्त्वाचे होते.या शाखेची ही पहिली व्यावसायिक मोहीम होती.

नवीन वर्षातील देदीप्यमान कामगिरीबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. पीएसएलव्ही-सी ५१ आणि ॲमेझोनिया-१ यांच्या प्रक्षेपणाची कामगिरी यशस्वी केल्याबद्दल संस्था कौतुकास पात्र आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील हे एक नवे पर्व आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. (सर्व फोटो - इस्रोच्या ट्विटर अकाऊंटवरून )