British Brands Owns By India: गर्व वाटेल! कधी हिंदुस्थानावर राज्य करायचे ब्रिटीश ब्रँड; आज भारतीयांची धूळ चाटतात By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 02:31 PM 2022-01-26T14:31:49+5:30 2022-01-26T14:48:05+5:30
British Brands Owns By India: एक, दोन नाहीत दहावर ब्रँड भारतीयांनी ब्रिटीशांच्या नाकावर टिच्चून विकत घेतले आहेत. यापैकी एक ब्रँड असा आहे की जो एका भारतीयाने विकत घेतला तर ब्रिटिशांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. आज आपण ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपला देश स्वतंत्र झाला, त्याच्या पूर्वीचा आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. परंतू एकेकाळी हिंदुस्थानावर राज्य करणारे ब्रिटीश ब्रँड आज भारतीयांची धूळ चाटत आहेत. एक, दोन नाहीत दहावर ब्रँड भारतीयांनी ब्रिटीशांच्या नाकावर टिच्चून विकत घेतले आहेत. यापैकी एक ब्रँड असा आहे की जो एका भारतीयाने विकत घेतला तर ब्रिटिशांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती.
Jaguar Land Rover: तुमच्या माहितीसाठी हा ब्रँड भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी विकत घेतला आहे. टाटांनी जेव्हा जग्वार लँड रोव्हर विकत घेतली तेव्हा ब्रिटीशांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. ब्रिटिशांनी जग्वारच्या कार वापरण्याचे सोडले होते. एकप्रकारचा बहिष्कार टाकला होता. टाटांनी ही कंपनी अमेरिकेच्या फोर्डकडून विकत घेतली होती. परंतू ती मुळची ब्रिटीश कंपनी होती. आज टाटा ही कंपनी पोसत आहेत परंतू त्यांनी ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून ही कंपनी भारतीय मालकीची केली आहे.
Royal Enfield: दुसरा ब्रँडही ऑटोमोबाईलचाच आहे. Royal Enfield त्याचे नाव. रॉयल एनफील्ड ब्रिटिश मोटरसाइकलिंगचा आयकॉनिक ब्रँड आहे. ब्रिटनच्या Redditch येथील The Enfield Cycle Company Ltd कंपनीने रॉयल एनफील्ड नावाने 1901मध्ये काम सुरु केले होते. स्वातंत्र्यानंतर हा ब्रँड ब्रिटीशच होता. १९९४ मध्ये आयशर मोटर्सने तो विकत घेतला.
Tetley Tea: टेटली चहा : भारतात चहाशिवाय सकाळ होत नसली तरी त्याचा इतिहास फार जुना नाही. चहा इंग्रजांनी भारतात आणला आणि त्यातून त्यांनी मोठी कमाईही केली. टेटली टी हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा ब्रिटीश चहाचा ब्रँड आहे. सध्या तो टाटा समूहाचा एक भाग आहे. सुमारे 200 वर्षे जुनी ही कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडमध्ये आली. तेव्हापासून हा ब्रिटीश ब्रँड भारतीय कंपनीचा भाग आहे. हा यूके तसेच कॅनडामध्ये सर्वाधिक विकला जाणारा चहाचा ब्रँड आहे.
The East India Company: द ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीचे भारतीय नाव कोणाला माहीत नसेल? उल्लेखाशिवाय ही यादी अपूर्ण आहे. भारत या कंपनीच्या ताब्यात होता, ज्याला कंपनी राज या नावाने इतिहासात शिकवले जाते. एकेकाळी ही कंपनी शेतीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंतची सर्व कामे करत असे. भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता यांनी ते विकत घेतल्यानंतर एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला. सध्या ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट आदींची ऑनलाइन विक्री करते.
Hamleys: हा ब्रँड जगभरातील प्रिमियम खेळण्यांची कंपनी आहे. भारतासह अमेरिका, ब्रिटन, चीन यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये या कंपनीचा मोठा व्यवसाय आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ने ही कंपनी 2019 मध्ये विकत घेतली. हॅम्लेजचे सध्या जगभरात २०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
Diligenta: डिलिजेन्टा: टाटा समूहाने स्वतंत्र भारतात उलट वसाहतवादाचे युग आणल्याचे म्हटले जाते. टाटांनी अनेक परदेशी कंपन्या विशेषतः ब्रिटीश ब्रँड्स खरेदी केल्या आहेत. ब्रिटीश आयटी कंपनी डिलिजेन्टा देखील टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसने विकत घेतली आहे. ही कंपनी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये रिटेल, फायनान्स, बँकिंग यासारख्या क्षेत्रांना आयटी सेवा पुरवते.
Corus Group: कोरस ग्रुप: टाटाच्या खरेदीच्या यादीतील हा तिसरा सर्वात मोठा ब्रिटीश ब्रँड आहे. कोरस ग्रुप जगभरातील पोलाद बाजारात ब्रिटनचा झेंडा उंचावत असे. ब्रिटनची सर्वात मोठी स्टील कंपनी टाटा समूहाच्या टाटा स्टील लिमिटेडने 2007 मध्ये विकत घेतली. आता ती टाटा स्टील युरोप म्हणून ओळखले जाते.
Optare: हा ब्रँड सध्या भारतीय ऑटो कंपनी अशोक लेलँडचा एक भाग आहे. ही कंपनी सिंगल डेकर, डबल डेकर, टुरिस्ट, लक्झरी आणि इलेक्ट्रिक बसेस बनवते. हा युरोपमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बस ब्रँडपैकी एक आहे. इलेक्ट्रिक बस बनवण्यातही ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे.
BSA Motorcycles: BSA मोटरसायकल: भारतातील क्लासिक बाइक मार्केटमध्ये अनेक बदल झाले आहेत. महिंद्रा ग्रुपच्या क्लासिक लीजेंडने 2016 मध्ये BSA मोटरसायकल खरेदी केली. हा ब्रँड एकेकाळी बर्मिंगहॅम स्मॉल आर्म्स कंपनीच्या मालकीचा होता, जो ब्रिटनच्या बड्या औद्योगिक घराण्यांपैकी एक होता. दिवाळखोर झाल्यानंतर क्लासिक लीजेंडने विकत घेतली होती.
Imperial Energy: इंपीरियल एनर्जी: यूकेची ही पेट्रोलियम आणि गॅस कंपनी सरकारी कंपनी ओएनजीसीने विकत घेतली आहे. ही कंपनी रशिया, यूके आणि इतर युरोपीय देशांमध्ये काम करते. सायबेरिया प्रदेशातील ही सर्वात मोठी कच्च्या तेलाची कंपनी मानली जाते.