तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:55 IST2025-04-10T16:39:42+5:302025-04-10T16:55:04+5:30

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं आहे.

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणाला भारतात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यापैकी एक महानिरीक्षक (आयजी) दर्जाचे अधिकारी आहे आणि दुसरे उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकारी आहेत.

अमेरिकेतून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या महत्त्वाच्या मोहिमेचे नेतृत्व एनआयएच्या या दोन अधिकाऱ्यांनी केले.

एनआयएची ही टीम रविवारी अमेरिकेत पोहोचली होती. मंगळवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमध्ये डीआयजी जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी 'सरेंडर वॉरंट'वर स्वाक्षरी केली. यानंतर, एनआयएच्या पथकाने बुधवारी सकाळी राणाला एका खास विमानाने भारतात आणले. या कारवाईत इतर तीन गुप्तचर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

आयजी आशिष बत्रा - १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आशिष बत्रा हे झारखंड केडरचे आहेत. ते सध्या एनआयएमध्ये आयजी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रतिनियुक्ती २०१९ मध्ये पाच वर्षांसाठी करण्यात आली होती. गृह मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२४ नंतर आणखी दोन वर्षांसाठी वाढवली.

एनआयएमध्ये सामील होण्यापूर्वी, बत्रा हे २० जानेवारी २०१८ पासून झारखंड जॅग्वार्सचे आयजी म्हणून काम करत होते. ते झारखंड पोलिसांचे प्रवक्ते देखील होते आणि आयजी कॅम्पेनची अतिरिक्त जबाबदारी देखील स्वीकारली होती.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची कार्यकारी आणि प्रशासकीय पदे भूषवली. त्यांची सुरुवातीची नियुक्ती जहानाबाद येथे तीन महिन्यांसाठी सहाय्यक अधीक्षक म्हणून होती. यानंतर ते हजारीबागचे एसपी होते. रांचीमध्ये त्यांनी १९ महिने शहर एसपी म्हणून काम केले आणि दीड वर्ष राज्यपालांच्या सुरक्षेतही त्यांची नियुक्ती झाली.

जया रॉय - २०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी जया रॉय देखील झारखंड केडरच्या आहेत. सध्या त्या एनआयएमध्ये डीआयजी पदावर कार्यरत आहेत. २०१९ मध्ये, त्यांना चार वर्षांसाठी पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून एजन्सीमध्ये प्रतिनियुक्त करण्यात आले. आता त्या एजन्सीमध्ये एका वरिष्ठ पदावर काम करत आहे.

जया रॉय यांची सर्वात प्रसिद्ध पोस्टिंग जामतारा येथे होती, जिथे त्यांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई केली. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले ते ऑपरेशन एका वेब सिरीजमध्येही दाखवण्यात आले होते. ज्यामुळे देशभरात त्यांच्या कामाचे आणि नेतृत्वाचे कौतुक झाले होते.