ज्या बंगल्यात ३९ वर्ष राहिले ज्योतिरादित्य शिंदे, अडीच वर्षांनी पुन्हा करणार एन्ट्री! वाचा रंजक कहाणी... By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 10:31 AM 2022-04-09T10:31:10+5:30 2022-04-09T10:39:38+5:30
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लवकरच 27, सफदरजंग रोड येथील सरकारी बंगल्यात पुन्हा प्रवेश करणार आहेत. याच बंगल्यात ज्योतिरादित्य शिंदे यांचं बालपण गेलं आहे आणि तोच बंगला त्यांना सोडावा लागला होता.
ज्योतिरादित्य शिंदेंसाठी हा फक्त एक सरकारी बंगला नसून त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा गुलदस्ता आहे. त्यांच्या वडिलांच्या माधवरावांच्या अनेक आठवणी याच्याशी निगडीत आहेत.
४२ वर्षांपूर्वी हा बंगला त्यांचे वडील माधवराव यांना देण्यात आला होता. ज्योतिरादित्य यांनी लहानपणीच या बंगल्यात प्रवेश केला होता. यासोबत त्याच्या आई-वडिलांच्या सुखद आठवणी आहेत. वडील माधवराव शिंदे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू ज्योतिरादित्य यांनी याच बंगल्यात घेतलं आहे. सत्तेचा राजमार्ग या बंगल्यातून जात होता. राजकीय बैठकांची रेलचेल इथंच असायची. या सगळ्या गोष्टींचे तरुण ज्योतिरादित्य साक्षीदार आहेत.
2001 मध्ये विमान अपघातात वडिलांच्या अकाली निधनानंतर राजकारणाची कमान अचानक ज्योतिरादित्य यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर याच बंगल्यातून राजकारणाचे धडे गिरवत ज्योतिरादित्य मोठे झाले. त्यांचा राजकीय प्रवास याच बंगल्यातून सुरू झाला. 2001 मध्ये, त्यांचे वडील माधवराव यांच्या निधनानंतर तीन महिन्यांनी, ज्योतिरादित्य यांनी याच बंगल्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकारणात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी एका नेत्याच्या पक्षप्रवेशासाठी थेट संबंधित नेत्याच्या घरी पोहोचले होते.
याच बंगल्यातील लॉनमध्ये ज्योतिरादित्य यांच्या पक्ष प्रवेशाचा संपूर्ण कार्यक्रम पार पडला होता, ज्यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. त्यानंतर शिंदे त्यांच्या पारंपरिक जागेवरून पोटनिवडणूक जिंकून पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. सामान्यत: कोणत्याही नेत्याला पक्षाच्या मुख्यालयात सदस्यत्व दिले जात असे, परंतु शिंदेंसाठी गांधी कुटुंबाने परंपरा मोडली होती.
ग्वाल्हेरचे पत्रकार केशव पांडे सांगतात, ज्योतिरादित्य शिंदे यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी असतो. ते याच बंगल्यात आपला प्रत्येक वाढदिवस साजरा करत आले आहेत. ते कुठेही गेले असले तरी १ जानेवारीला घरी असायचे.
मोदी लाटेत सरकारी बंगला गेला ज्योतिरादित्यही मोदी लाटेतून सुटू शकले नाहीत. काँग्रेसमध्ये असताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ज्योतिरादित्य यांना सरकारी बंगला सोडावा लागला होता. 2020 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य यांना मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये हा बंगला पुन्हा देण्यात आला, परंतु त्याचा ताबा मिळण्यासाठी त्यांना आठ महिने लागले.
गेल्या वर्षी जुलैमध्ये 27, सफदरजंग रोडवरील हा बंगला शिंदे यांना देण्यात आला होता. तेव्हा माजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक त्यात राहत होते. शिंदे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांना दिल्लीतील तीन बंगल्यांपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आला. मग त्यांनी आनंद लोक या खासगी निवासस्थानी राहणे योग्य समजले आणि आपला बंगला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
बंगल्याचा सुवर्ण इतिहास 42 वर्षांपूर्वी 1980 पासून हा बंगला ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याकडे होता. त्यानंतर ते राजीव गांधी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले. 1996 मध्ये काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर माधवराव यांनी खासदार विकास काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र, नंतर तो काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. अशाप्रकारे हा बंगला ज्योतिरादित्य यांच्या वडिलांच्या प्रत्येक राजकीय हालचालींचे केंद्र होता. माधवराव शिंदे यांच्या निधनानंतरही हा बंगला शिंदे कुटुंबाकडेच राहिला. नंतर, ज्योतिरादित्य शिंदे केंद्रात मंत्री झाले, एनडीए सरकारमध्ये खासदार होते. तरीही त्याच बंगल्यात राहिले. अशाप्रकारे ज्योतिरादित्य यांच्या या बंगल्यात जवळपास ३९ वर्षे गेली.
वडिलांचा शेवटचा प्रवास याच बंगल्यातून झाला 2001 मध्ये जेव्हा माधवराव शिंदे यांचे विमान अपघातात निधन झाले तेव्हा त्यांची अंत्ययात्रा याच बंगल्यातून निघाली. त्यामुळे ज्योतिरादित्य यांचे या बंगल्याशी भावनिक बंध जोडले गेलेले आहेत. जवळपास दोन दशकं वडिलांचा दिल्ली दरबार याच बंगल्यात चालला होता. मध्य प्रदेशातून इतर राज्यांतील बडे नेते या बंगल्यावर जायचे.
जोपर्यंत ज्योतिरादित्य या बंगल्यात राहिले, तोपर्यंत त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाची पाटी कधीच काढली नाही. हा बंगला तत्कालीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना देण्यात आला, तेव्हा माधवराव शिंदे यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली. मात्र, आता बंगल्याच्या बाहेर कोणाचाही पाटी नाही.