kadaknath black chicken demand increased madhya pradesh
कोरोनामुळे कडकनाथची मागणी वाढली, एक कोंबडा विकला जातोय 850 रुपयांना By ravalnath.patil | Published: November 28, 2020 06:11 PM2020-11-28T18:11:14+5:302020-11-28T19:01:25+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आढळणार्या कोंबड्यांची अतिशय खास जात असलेल्या कडकनाथची मागणी देखील देशात वाढली आहे. मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्ह्यात आढळणाऱ्या अनोख्या काळा रंगाच्या कडकनाथ कोंबड्यांची मागणी वाढली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान कडकनाथ कोंबड्यांची मागणी आजकाल बरीच वाढली आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान मागणी कमी झाली होती. मात्र, अनलॉकची अंमलबजावणी झाल्यानंतर कडकनाथ कोंबड्यांची मागणी सतत वाढत आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कडकनाथ कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, पोल्ट्री फार्म मालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याकरिता राज्य सरकारने उत्पादन आणि विक्री वाढविण्याची योजना तयार केली आहे. या जातीच्या कोंबड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी सहकारी शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. झाबुआ, अलिराजपूर, बडवानी आणि धार जिल्ह्यातील नोंदणीकृत कुक्कुटपालनांमध्ये एकूण कोंबड्यांचे पालन करणारे 300 सदस्य आहेत. झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तोमर म्हणाले, देशभरातून कुक्कुटपालनांचे मालक कडकनाथ पिल्ले खरेदीसाठी येत आहेत. मात्र, कोरोनाविरूद्धच्या लढाईत या कोंबड्यांच्या वापरावरून कोणताही स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास केला गेला नाही. मात्र, हे निश्चितपणे आढळले आहे की, या विशिष्ट प्रकारच्या कोंबड्यांच्या मांसात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि इतर कोंबड्यांच्या तुलनेत चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. दिल्लीत या जातीच्या कोंबडीची किंमत अंदाजे 850 रुपये आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसायcorona virusbusiness