वेळेत उपचार न मिळाल्यानं आई गेली; मुलानं बाईकची रुग्णवाहिका केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 17:30 IST2019-02-17T17:22:14+5:302019-02-17T17:30:55+5:30

पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमधील ढालाबारी गावात राहणारे करीम उल हक दुचाकीवरुन रुग्णांना दवाखान्यात, रुग्णालयात घेऊन जातात. आसपास राहणाऱ्या गावातील लोकांना तातडीनं उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी त्यांच्या दुचाकीचं रुपांतर रुग्णवाहिकेत केलं आहे.
करीम यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. मात्र तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून ते रुग्णांना मदत करतात. विशेष म्हणजे यासाठी ते कोणाकडून एक पैसादेखील घेत नाहीत.
कोणाला खरचटलं, रक्तस्राव झाला की करीम त्यांच्यावर प्रथमोपचार करतात. याचं प्रशिक्षण त्यांनी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून घेतलं आहे. त्यांच्या दुचाकीवर एक प्रथमोपचार पेटी सदैव असते. याशिवाय करीम यांना इंजेक्शनदेखील देता येतं.
जवळपास 20 गावांमध्ये करीम सेवा देतात. कोणत्याही अपेक्षेशिवाय देणारे करीम आता अॅम्ब्युलन्स दादा म्हणून ओळखले जातात.
करीम यांच्या आजारी आईला वेळेत उपचार न मिळाल्यानं 20 वर्षांपूर्वी त्यांना जीव गमवावा लागला. तशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी करीम यांनी दुचाकीवरुन रुग्णांना दवाखान्यात, रुग्णालयात पोहोचवण्याची सुरुवात केली.
प्रणब मुखर्जी राष्ट्रपती असताना करीम यांचा पद्मश्रीनं सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी अधिक जोमानं काम करण्यास सुरुवात केली.
करीम यांच्या या कार्यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट बंगाली असेल. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये विनय मुदगिल 'ऍम्ब्युलन्स मॅन' नावाच्या चित्रपटावर काम करत आहेत.