इथे ओशाळली माणुसकी! अवघ्या ३.४६ रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर १५ किमी पायपीट करण्याची वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:43 PM 2020-06-28T15:43:22+5:30 2020-06-28T15:52:21+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्याचा फटका हातावर पोट असलेल्या देशातील लाखो मजुरांना बसला. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पायपीट करावी लागली.
कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचेदेखील हाल झाले. वाहतूक ठप्प असल्यानं शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्याचा फटका शेतीला बसला.
अद्यापही देशाच्या अनेक भागांमधील वाहतूक सेवा पूर्ववत झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे. या परिस्थितीत एका शेतकऱ्याला बँकेकडून अतिशय वाईट अनुभव आला.
काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातल्या बरुवे गावातील अमडे लक्ष्मीनारायण नावाच्या शेतकऱ्याला बँकेतून फोन आला.
तुम्ही काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड बाकी असल्यानं तातडीनं बँकेत या, असं त्यांना सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती त्यांनी देण्यात आली नाही. लॉकडाऊन सुरू असल्यानं लक्ष्मीनारायण चालत बँकेच्या दिशेनं निघाले.
वाहतुकीचं कोणतंच साधन नसल्यानं लक्ष्मीनारायण १५ किलोमीटर अंतर पायी तुडवत निघाले. मात्र बँकेमध्ये पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला.
लक्ष्मीनारायण यांनी बँकेत पोहोचल्यावर नेमकं किती कर्ज शिल्लक आहे याबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांना केवळ ३ रुपये ४६ पैसे इतक्याच कर्जाची परतफेड शिल्लक असल्याचं उत्तर मिळालं.
लक्ष्मीनारायण यांनी तातडीनं साडे तीन रुपये भरले. मात्र या घटनेमुळे मोठा धक्का बसला. अवघ्या साडे तीन रुपयांसाठी बँकेनं दिलेला त्रास अमानवी स्वरुपाचा असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अवघ्या साडे तीन रुपयांसाठी बँकेनं मला त्वरित बोलावलं. सध्या या भागात वाहतुकीची साधनं उपलब्ध नाहीत, याची कल्पना तिथल्या कर्मचाऱ्यांना असूनही त्यांनी अशा प्रकारचा मेसेज मला दिला. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे, असं लक्ष्मीनारायण म्हणाले.
लक्ष्मीनारायण यांनी शेतीसाठी ३५ हजारांचं कर्ज घेतलं होतं. त्यातलं ३२ हजारांचं कर्ज माफ झालं. तर उर्वरित ३ हजार रुपयांची परतफेड त्यांनी काही महिन्यांपूर्वीच केली होती.