पहलगामध्ये दहशतवाद्यांनी 'त्या' मुस्लिम तरुणाची हत्या का केली? कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:30 IST2025-04-23T17:24:43+5:302025-04-23T17:30:24+5:30

Syed Adil Hussain Shah: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले. त्यांची ओळख पटवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.

दहशतवाद्यांनी हिंदू असलेल्या पर्यटकांवर गोळीबार केली. दहशतवाद्यांनी सहा पुरुषांची तर त्यांच्या पत्नीसमोरच निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सय्यद हुसेन शाह नावाच्या काश्मिरी व्यक्तीलाही आपला जीव गमवावा लागला. तो घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता.

पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह हा घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. हल्ल्याच्या दिवशी तो घोडेस्वारी करण्यासाठी पहलगामला गेला होता. तीन वाजता त्याच्या कुटुंबियांना कळले की बैसरणमध्ये हल्ला झाला आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सय्यद हुसेन शाहने सोबत नेलेल्या पर्यटकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, जेव्हा त्याने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्यालाही ठार मारले.

काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे की, सय्यद हुसेन शाह पर्यटकांना फिरायला घेऊन जाण्यासाठी त्याच्या घोड्यावरून बैसरनला आला होता. हल्ल्याच्या वेळी तो तिथेच होता. जेव्हा दहशतवादी गोळ्या झाडत होते आणि निष्पाप लोकांना मारत होते, तेव्हा त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला.