केजरीवालांनीच केजरीवालांना हरविले! आपच्या पराभवाची ही कारणे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:40 IST2025-02-08T14:34:24+5:302025-02-08T14:40:23+5:30

BJP vs AAP Delhi Election Results 2025 news: अण्णा हजारेंसोबतच्या आंदोलनावेळचे केजरीवाल आणि आताचे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सामान्य माणसाचा चेहरा घेऊन राजकारणाची सुरुवात करणाऱ्या केजरीवालांची तीच प्रतिमा कायम राहिली नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होत आले आहे. भाजप ४८, आप २२ जागांवर तर काँग्रेस ० असा निकाल लागत आहे. निकाल हाती येईपर्यंत यात काहीसा बदल होऊ शकतो. हा पराभव आपच्या एवढा जिव्हारी लागला आहे की, त्यांनी पक्ष कार्यालयाचे गेटच आतून बंद करून टाकले आहे. आपचे एवढे पानिपत का झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये केजरीवालांनीच केजरीवाल आणि आपचा पराभव केल्याचे म्हटले जात आहे.

अण्णा हजारेंसोबतच्या आंदोलनावेळचे केजरीवाल आणि आताचे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सामान्य माणसाचा चेहरा घेऊन राजकारणाची सुरुवात करणाऱ्या केजरीवालांची तीच प्रतिमा कायम राहिली नाही. दारु घोटाळ्यात गोव्यात लढण्यासाठी घेतलेले पैसे, शीशमहलवर केलेला करोडोंचा खर्च आदी गोष्टी त्यांची लोकांत असलेली प्रतिमा उध्वस्त करून गेल्या. त्यांची हुकूमशाही नेतृत्वशैली आणि हट्टी वृत्तीमुळे लोकांचा विश्वास तुटला.

जुनी वॅगन आर, साधा शर्ट पँट, मेट्रोचा प्रवास आणि सुरक्षा घेण्यास नकार आदी गोष्टींमुळे केजरीवाल सुरुवातीला लोकांच्या मनात भरले होते. परंतू, ४० कोटी रुपयांच्या शीशमहालातील श्रीमंती पाहून लोकांच्या डोळ्याची पारणे फिटली आणि त्यांचे डोळे उघडले. जनतेने त्यांना स्वतःचा नेता म्हणून निवडले होते पण त्यांची व्हीव्हीआयपी जीवनशैली पाहिल्यानंतर जनतेला स्वतःची फसवणूक झाल्याचे वाटू लागले होते.

केजरीवाल भ्रष्टाचाराविरुद्धच्या चळवळीतून उदयास आलेले नेते होते. पण तेच भ्रष्टाचारात लिप्त झाले. अबकारी कर घोटाळा हा त्यात सर्वाधिक डॅमेज करणारा ठरला. त्यात ते तुरुंगातही गेले होते. दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलता बोलता केजरीवाल आणि आप कधी भ्रष्टाचारात बरबटली हे त्यांनाही समजले नाही. जेव्हा हा मुद्दा आला तेव्हा ते स्वत:च्या बचावासाठी ठोस उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांनाच दोष देत सुटले आणि आपणच त्या प्रश्नांत अडकत गेले.

योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि कुमार विश्वास अशा नेत्यांची सुरुवातीला मिळालेली साथ केजरीवालांना वैचारिक चळवळीचे बळ देत होती. परंतू, हे लोक एकामागोमाग एक सोडून गेले. केजरीवाल यांच्यावर हुकूमशाही वृत्ती स्वीकारल्याचा आरोप होऊ लागला. पक्षातील लोकशाही व्यवस्था हळूहळू संपुष्टात आली आणि केजरीवाल यांनी हायकमांड स्टाईलमध्ये निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे आप फक्त व्यक्तीकेंद्रीत पक्ष बनला, तेच लोकांपर्यंत गेले.

सुरुवातीला केजरीवाल हे शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांवर केंद्रीत राजकारण करत होते. परंतू, हळूहळू ते फ्रीबीज म्हणजे मोफतच्या योजनांकडे वाहत गेले. यातूनच एकावर एक दारु फ्री वाटली गेली. या काळात वाईन शॉपसमोर एवढ्या रांगा लागलेल्या की या दारुड्यांनी जरी मतदान केले असते तरी केजरीवाल जिंकले असते. परंतू तसे झाले नाही, केजरीवालच घोटाळ्यात आत गेले. ज्यांनी दारु पुरविली ते देखील आत गेले.

केजरीवाल यांना लोकांमध्ये जाणारा नेता मानले जात होते, परंतू जसजशी सत्ता मिळत गेली तसे ते बदलत गेले. जनतेने त्यांना उंचीवर नेले होते, पण जेव्हा त्यांनी त्यांची ओळख बदलली तेव्हा जनतेने त्यांना जमिनीवर आणले आहे.

राजकीय तज्ञांच्या मते आप हा पक्ष एका चळवळीतून उदयास आलेला आहे. त्यांच्याकडे कोणतेही ठोस असे कार्यकर्ते नाहीत. हे लोक कधीही बाजुला होऊ शकतात. आप जर सत्तेबाहेर गेली तर संपून जाणार, असे भाकीत केले जात आहे.