Kids On Two Wheeler : मुलांना दुचाकीवरून नेताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:08 AM2022-02-20T11:08:20+5:302022-02-20T11:17:42+5:30

चिमुकल्यांना आपल्या दुचाकीवरून घेऊन जाताना आता सुरक्षेसंदर्भात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

चिमुकल्यांना आपल्या दुचाकीवरून घेऊन जाताना आता सुरक्षेसंदर्भात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार नऊ महिने ते चार वर्षे या वयोगटातील लहानग्यांना दुचाकीवरून प्रवास करताना क्रॅश हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट आवश्यक असणार आहे.

दुचाकीचा वेग ४० पेक्षा जास्त नसावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकीस्वारास एक हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्यांपर्यंत परवाना जप्त करण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार दुचाकीवरून लहानग्यांसोबत प्रवास करताना क्रॅश हेल्मेट आणि हार्नेस बेल्टचा वापर बंधनकारक असणार आहे. अन्यथा दुचाकीस्वारास एक हजार रुपये दंड आणि तीन महिने परवाना जप्त करण्यात येणार आहे.

दुचाकीवर लहान मुलांना घेऊन प्रवास करताना अनेकदा त्यांना हेल्मेट घातले जात नाही. त्यामुळे आता नव्या नियमानुसार लहानग्यांनाही सायकल हेल्मेट किंवा क्रॅश हेल्मेट घालणे अनिवार्य असणार आहे. लहान मुलांसाठी बाजारात छोट्या आकाराचे क्रॅश हेल्मेट उपलब्ध आहेत.

हार्नेस बेल्टचा वापर लहान मुलं स्कूल बॅगप्रमाणे करू शकतात. स्कूल बॅगप्रमाणे हा बेल्ट पाठीवर घालून त्याला मुलांच्या शरीरानुसार कमी जास्त करता येते. हा बेल्ट दुचाकी चालकासोबत बांधावा लागतो. यामुळे लहान मूल दुचाकीवर सुरक्षित राहू शकते.

लहानग्यांसोबत प्रवास करताना दुचाकीचा वेग ४० किमी प्रति तास असणे गरजेचे आहे. गाडीचा वेग कमी असल्यास अपघाताची शक्यता कमी असते, त्यामुळे हा नियम लागू करण्यात आला आहे.