Lalu Prasad Yadav : "बाबांसाठी मी काहीही करू शकते..."; किडनी देण्याआधी लालू प्रसाद यादव यांची लेक भावूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:37 AM 2022-12-05T11:37:17+5:30 2022-12-05T11:55:26+5:30
Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांना लेकीने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. लालू-राबरी यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य हिच्या किडनीमुळे राजद प्रमुखांना नवीन जीवन मिळणार आहे. दीर्घकाळापासून आजारी असलेले राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या लेकीने किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या लालू-राबरी यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य हिच्या किडनीमुळे राजद प्रमुखांना आता नवीन जीवन मिळणार आहे.
एकाच वेळी अनेक आजारांशी लढा देणाऱ्या लालूंनी सिंगापूरमध्येच किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूरच्या डॉक्टरांनी त्याला मान्यता दिली आहे. किडनी प्रत्यारोपणासाठीही सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाईल.
शस्त्रक्रियेआधी रोहिणी भावूक झाल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या वडिलांना किडनी दान करणार म्हणजे मी फक्त माझ्या शरीरातील मांसाचा एक तुकडा काढून देणार आहे अशा शब्दांत रोहिणी यांनी भावना मांडल्या. तसेच वडिलांसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
"माझ्यासाठी आई-वडील देव आहेत. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. तुमच्या इच्छेने मला अधिक बळ दिले आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे विशेष प्रेम आणि आदर मिळत आहे. मी भावूक झाले आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छिते" असं म्हटलं आहे.
"ज्या वडिलांनी मला या जगात आवाज दिला. जे माझे सर्वस्व आहेत त्यांच्यासाठी जर मी माझ्या आयुष्यातील एक छोटासा भाग देखील देऊ शकले तर मी खूप भाग्यवान होईन. पृथ्वीवर आई-वडील हे देव आहेत. त्यांची पूजा व सेवा करणे हे प्रत्येक मुलांचं कर्तव्य आहे"
"'मला विश्वास आहे की, हा मांसाचा एक छोटा तुकडा आहे जो मला माझ्या वडिलांसाठी द्यायचा आहे. मी माझ्या वडिलांसाठी काहीही करू शकते. तुम्ही सर्वजण प्रार्थना करा की सर्व काही चांगल्या पद्धतीने होईल आणि बाबा पुन्हा तुमच्या सर्वांचा आवाज बुलंद करतील" असं रोहिणी यांनी म्हटलं आहे.
सिंगापूरमध्ये राहून रोहिणी आचार्य आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहतात. रोहिणी आचार्य याही इंटरनेटच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणात हस्तक्षेप करत असतात. अनेकवेळा त्या आपल्या कुटुंबावर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांविरुद्ध बचाव करण्यासाठी पुढे आल्या आहेत. रोहिणी आचार्य सोशल मीडियाचा चांगला वापर करून नेहमीच आक्रमक वृत्ती दाखवत असतात.
लालू यांची प्रकृती बिघडल्यानंतर रोहिणी त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार व्हावेत यासाठी कुटुंबीयांना तयार करत होत्या. रोहिणी यांनी स्वतः पुढाकार घेत किडनी सेंटरमध्ये बोलून उपचाराचा मार्ग मोकळा केला. स्वत: लालू प्रसाद यादव आपल्या मुलीकडून किडनी घेण्याच्या बाजूने नसले तरी अखेरीस रोहिणींनी त्यांना त्यासाठी तयार केले.
रोहिणी आचार्य यांनी लालू यादव यांना चांगलेच समजावून सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी किडनी घेतल्यास यशाचे प्रमाण जास्त असते. लालू यादव सध्या किडनी रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फॉर किडनी डिजीजमध्ये उपचार घेत आहेत. दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी लालूंना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला नव्हता, परंतु सिंगापूरमधील डॉक्टरांनी तपासणीनंतर ओके केलं आहे.
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव 12 ऑक्टोबरला किडनी प्रत्यारोपणाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी सिंगापूरला गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, मोठी मुलगी मीसा भारती होत्या. सिंगापूरमध्ये डॉक्टरांनी आधी लालूंची आणि त्यानंतर रोहिणी यांची तपासणी केली. त्यानंतर होकार दिला आणि आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.