सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 07:22 PM2023-09-29T19:22:35+5:302023-09-29T19:28:18+5:30

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत.

LCH Prachand: भारतीय हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाकडे 156 स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर 'प्रचंड'ची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या या मागणीला मंत्रालय लवकरच ग्रीन सिग्नल मिळेल. ही सर्व हेलिकॉप्टर स्वदेशी असतील. 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 प्रचंड हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत.

या दोन्ही सैन्याकडे सध्या 15 हेलिकॉप्टर आहेत. 10 हवाई दलाकडे, तर 5 सैन्याकडे आहेत. हे सर्व हेलिकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय जी नवीन हेलिकॉप्टर येणार आहेत, तीदेखील चीन आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ मोक्याच्या ठिकाणांवर तैनात केली जातील.

पहिली स्क्वाड्रन पाकिस्तानच्या सीमेजवळ तैनात आहे. त्यामुळे पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवणे अधिक चांगले आणि सुरक्षित झाले आहे. तसेच दहशतवादी आणि घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे. प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) करत आहे. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई दलाने लष्करी सरावही केला होता.

प्रचंड हेलिकॉप्टर कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू (CSAR), डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स (DEAD), काउंटर इन्सर्जन्सी (CI) ऑपरेशन्स, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (RPA's) शूट करणे आणि उच्च उंचीवरील बंकर बस्टिंग ऑपरेशन्समध्ये मदत करतील.

यापूर्वी, बंगळुरूमध्ये एलसीएचचे पहिले स्क्वॉड्रन तयार करण्यात आले होते. जेणेकरुन LAC जवळ चीनच्या कारवाया थांबवण्यास मदत होईल. ही हेलिकॉप्टर सात वेगवेगळ्या डोंगराळ भागात सात युनिटमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. LCH मध्ये दोन लोक बसू शकतात.

हेलिकॉप्टर 51.10 फूट लांब, 15.5 फूट उंच आहे. संपूर्ण उपकरणांसह याचे वजन 5800 किलो आहे. त्यावर 700 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतात. याचा कमाल वेग 268 किमी प्रति तास आहे. रेंज 550 किमी आहे. 3 तास 10 मिनिटे सतत उड्डाण करण्याची क्षमता आहे.

एलसीएचमध्ये 20 मिमीची तोफ आहे. याशिवाय, रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि बॉम्बस असे चार हार्डपॉइंट्स तैनात केले जाऊ शकतात. या हेलिकॉप्टरचा कॉकपिट काचेचा आहे. तसेच फ्रेम संमिश्र आहे. भविष्यात त्याचे व्हर्जन आणखी अपग्रेड केली जाईल. हे 16,400 फूट उंचीवर पुरेसे शस्त्रे आणि आवश्यक वस्तूंसह उड्डाण करू शकते.

ध्रुव हेलिकॉप्टर विकसित करून एलसीएच तयार करण्यात आले आहे. कारगिल युद्ध सुरू असताना या हेलिकॉप्टरची गरज निर्माण झाली होती. तेव्हापासून याबाबत काम सुरू होते. चाचण्यांदरम्यान, भारतातील सर्व प्रकारच्या क्षेत्रात उड्डाण करण्याची क्षमता याने दाखवली होती. सियाचीन असो, 13 हजार ते 16 हजार फूट उंचीचे हिमालय पर्वत असो, वाळवंट असो किंवा जंगल असो.

एलसीएच हेलिकॉप्टर तैनात केल्यानंतर जुनी एमआय-35 आणि एमआय-25 हेलिकॉप्टर हटवली जातील. ही दोन्ही हेलिकॉप्टर रशियाने बनवली आहेत. हवाई दल दीर्घकाळापासून त्यांचा वापर करत आहे. एक स्क्वॉड्रन बंद झाला आहे. त्याच्या जागी बोइंग कंपनीची AH-64E अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.