light combat helicopter: मोदी सरकारचा मोठा निर्णय, सैन्याला मिळणार आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर; अशी आहेत वैशिष्ट्ये... By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:10 PM 2022-03-30T21:10:11+5:30 2022-03-30T21:13:59+5:30
light combat helicopter: केंद्र सरकार एचएएलकडून 3 हजार 387 कोटींमध्ये हे लाइट कॉम्बॅक्ट खरेदी करणार असून, 10 हेलिकॉप्टर हवाई दल आणि पाच भारतीय लष्करासाठी असतील. नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने 15 स्वदेशी लाइट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर (LCH) खरेदीला मंजुरी दिली आहे. एचएएलकडून 3,387 कोटींना हे हेलिकॉप्टर खरेदी केले जाणार आहेत. यातील 10 हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि पाच भारतीय लष्करासाठी असतील.
गेल्या वर्षी म्हणजे 19 नोव्हेंबर 2021 रोजी राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे मॉडेल हवाई दलाला सुपूर्द केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने 17-19 नोव्हेंबर दरम्यान झाशी येथे राष्ट्रीय संरक्षण आत्मसमर्पण पर्व साजरे केले. याच अंतर्गत झाशी येथे देशाच्या सशस्त्र दलांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कारगिल युद्धापासूनच भारताने एलसीएच स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्यावेळी भारताकडे 15-16 हजार फूट उंचीवरुन शत्रूची बंकर नष्ट करू शकणारे हेलिकॉप्टर नव्हते. पण बऱ्याच वर्षानंतर 2006 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. गेल्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) तयार करण्यात आले आहे.
भारताने नुकतेच अमेरिकेकडून अटॅक हेलिकॉप्टर अपाचे विकत घेतले आहे. पण कारगिल आणि सियाचीनच्या शिखरांवर अपाचे टेक ऑफ आणि लँडिंग करू शकत नाही. याउलट वजनाने हलके असल्याने आणि विशेष रोटर्स असल्याने एलसीएच अशा अवघड शिखरांवर लँडिंग आणि टेकऑफ अगदी सहजतेने करू शकते.
ही आहेत LCH ची वैशिष्ट्ये- लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएच हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 6 टन आहे, ज्यामुळे ते खूप हलके आहे. अपाचेचे वजन सुमारे 10 टन आहे. कमी वजनामुळे ते उंचावर असलेल्या भागातही क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज टेकऑफ आणि लँडिंग करू शकते.
एलसीएच अटॅक हेलिकॉप्टरमध्ये फ्रान्समधून आणलेली हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे 'मिस्ट्रल' क्षेपणास्त्रे बसवता येते. एलसीएचमध्ये प्रत्येकी 70 मिमीच्या 12-12 रॉकेटच्या दोन पॉड आहेत. याशिवाय, एलसीएचच्या पुढील भागात 20 एमएम गन बसवण्यात आली आहे, जी 110 डिग्रीमध्ये कोणत्याही दिशेने फिरू शकते. कॉकपिटची सर्व वैशिष्ट्ये पायलटच्या हेल्मेटवर प्रदर्शित केली जातात, याशिवा हे हेलिकॉप्टर शत्रूच्या रडारवर सहजासहजी येत नाही.
सियाचीन ग्लेशियरपासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत चाचणी- भारतीय हवाई दलासाठी पूर्णपणे तयार होण्यापूर्वी या स्वदेशी एलसीएच हेलिकॉप्टरची चाचणी सियाचीन ग्लेशियरपासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत करण्यात आली आहे. या दरम्यान, एलसीएचमध्ये पुरेसे इंधन आणि त्याची शस्त्रे देखील होती.