नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:33 PM2020-05-19T20:33:59+5:302020-05-19T20:48:04+5:30

भारत आणि नेपाळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमेवरून सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. नेपाळने सोमवारी आपल्या देशाचा नकाशा जारी केला. यात त्याने भारताचे कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा ही तीन ठिकाणंही दाखवली आहेत. यानंतर आता तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतावर निशाणा साधत गंभीर वक्तव्य केलं आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांनी ट्विट केले आहे, की भारताच्या अशोक चक्रात सत्यमेव जयते लिहिलेले आहे, की सिंहमेव जयते. ओलींचा इशारा भारताच्या सामर्थ्यावर आहे.

भारतासोबतच्या सीमावादावर नेपाळचे पंतप्रधान म्हणाले, ऐतिहासिक गैरसमज संपवण्याचा विचार भारतसोबत चांगली मैत्री करण्यासाठीच आहे. यासंदर्भात चीनसोबतही चर्चा सुरू आहे आणि नेपाळने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

भारताने 8 मेरोजी उत्तराखंडमधील लिपुलेखपासून कैलास मानसरोवरसाठी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले होते. यावर नेपाळने आक्षेप घेतला होता.

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली म्हणाले होते, भारताने भलेही लिपुलेखमध्ये तयार केलेल्या रस्त्याचा वापर करावा, मात्र, आपण आपल्या पूर्वजांच्या इंच जमिनीवरचाही दावा सोडणार नाही.

माध्यमांमधील वृत्तांनुसार, ओली यांनी रविवार झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत भारतीय लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. नरवणे यांनी चीनचे नाव न घेता म्हटले होते, की लिपुलेखसंदर्भात नेपाळ दुसऱ्याच्या इशाऱ्यावर विरोध करत आहे. खरे तर, नेपाळ आर्मी आणि सरकारने नरवणे यांच्या या वक्तव्यावर अधिकृतपणे कसल्याही प्रकारची प्रितिक्रिया दिलेली नाही.

भारताने 6 महिन्यांपूर्वी जम्मू-कश्मीरचे दोन भागांत विभाजन केल्यानंतर नवा नकाशा जारी केला होता. तेव्हा यात कालापानीचा समावेश केल्याने नेपाळने आक्षेप नोंदवला होता. तेव्हापासूनच नेपाळमध्ये देशाचा नवा नकाशा तयार करण्याची मागणी होत होती.

नेपाळ कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरावर सुगौली तहाच्या आधारावर आपला दावा सांगतो. नेपाळ आणि ब्रिटिश भारतादरम्यान 1816ला सुगौली तह झाला होता. या तहानुसार, महाकाली नदी ही सीमारेषा निश्चित करण्यात आली होती.

जानकारांच्या मते, भारत-नेपाळ सीमा वाद हा महाकाली नदीच्या उत्पत्तीवरूनच आहे. नेपाळचे म्हणणे आहे, की या नदीचा उगम लिपुलेखजवळील लिम्पियाधुरा येथूनच आहे आणि ती नैऋत्येकडे वाहते. तर भारत कालपानी हे नदीचे उगमस्थान असल्याचे मानतो आणि ती आग्नेय दिशेला वाहते, असे मानतो.

परराष्ट्र मंत्रालयाने लिपुलेखमध्ये रोड लिंक खुली केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेपाळने यासंदर्भात वक्तव्य जारी करत विरोध केला होता आणि भारतीय राजदूत विनय कुमार क्वात्ररा यांना डिप्लोमॅटिक नोटही सुपूर्त केली होती.

या नोटला उत्तर देताना भारताने म्हटले होते, की रस्त्याचे काम भारतीय हद्दीतच झाले आहे. मात्र, नेपाळशी जवळचे संबंध असल्याने भारत हा मुद्दा डिप्लोमॅटिक पद्धतीने सोडविण्याचे समर्थन करतो. तसेच, दोघेही आधी कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे लढूया, यानंतर सीमा प्रश्नावर चर्चा होईलच. मात्र, नेपाळने ही विनंतीही धुडकावली.