बंगला, गाडी, मोफत प्रवास, टोल फ्री, आजपासून २८० नव्या खासदारांना मिळणार या सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:15 PM2024-06-24T14:15:20+5:302024-06-24T14:20:27+5:30

Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी नियोजित आहे. शपथविधीनंतर हे खासदार अधिकृतपणे लोकसभेचे सभासद होतील. त्यात अनेक खासदार असे आहेत, जे पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेणार आहेत. लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर या खासदारांना लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या सुविधा मिळणं सुरू होईल. या खासदारांना कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत, याची माहिती पुढील प्रमाणे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी नियोजित आहे. शपथविधीनंतर हे खासदार अधिकृतपणे लोकसभेचे सभासद होतील. त्यात अनेक खासदार असे आहेत, जे पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेणार आहेत. लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर या खासदारांना लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या सुविधा मिळणं सुरू होईल. या खासदारांना कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत, याची माहिती पुढील प्रमाणे.

१८ व्या लोकसभेमध्ये यावेळी निवडून आलेल्या खासदारांमध्ये अनेक खासदार असे आहेत जे पहिल्यांदा निवडून आले आहेत. सभागृहामधील ५२ टक्के खासदार पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत. अशा पहिल्याने निवडून आलेल्या खासदारांची संख्या ही २८० आहेत. उत्तर प्रदेशमधून ४५ खासदार पहिलल्यांदाच निवडून आले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ३३ खासदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेच्या सदस्यांना पगारासह अनेक भत्ते, प्रवास सुविधा, घर, टेलिफोन, पेन्शन आदि सुविधा मिळतात. ११ मे २०२२ रोजी पगार आणि भत्त्यांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनुसार खासदारांना १ लाख रुपये पगा मिळतो. त्याशिवाय घरावर बैठक घेण्यासाठी दररोज २ हजार रुपये भत्ता मिळतो.

त्याशिवाय खासदारांना सभागृहाचं अधिवेशन, समितीची बैठक यांना उपस्थित राहण्यासाठी प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यासाठी खासदारांना सभागृहात येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो.

याबरोबरच खासदारांना काही प्रवासासाठी रेल्वेच्या प्रथमश्रेणीमधून मोफत प्रवास करण्याची सवलत मिळते. तसेच खासदारांच्या कुटुंबीयांसाठी काही सवलती मिळतात. तर अंदमान निकोबार आणि लक्षद्विपच्या खासदारांना स्टिमरची सुविधा दिली जाते. प्रवासाच्या सवलतींबाबत काही नियम आहेत, त्यानुसार खासदारांना सवलत दिली जाते. याासोबतच प्रत्येक खासदाराला कार्यालयीन खर्चासाठी पैसे मिळतात.  

अधिकृत संकेतस्थळानुसार प्रत्येक खासदाराला २० हजार रुपये भत्ता, लेखन सामुग्रीसाठी ४ हजार रुपये, पत्रव्यवहारासाठी २ हजार रुपये, तसेच स्टाफसाठीही काही रक्कम दिली जाते. त्याशिवाय टोलमधील सवलतीसाठी खासदारांना दोन फास्टॅग दिले जातात. त्यातील एक दिल्लीसाठी आणि दुसरा त्यांच्या मतदारसंघासाठी असतो. त्या माध्यमातून खासदारांना टोल न भरता प्रवास करता येतो. त्याशिवाय सर्वसामान्यांना जाण्यास मनाई असलेल्या काही भागात जाण्याचीही खासदारांना परवानगी असते.

एकूण रक्कम पाहायची झाल्यास खासदारांना वेतन म्हणून १ लाख रुपये, मतदारसंघासाठी ७० हजार रुपये भत्ता, कार्यालयीन खर्चासाठी सुमारे ६० हजार रुपये आणि इतर दैनिक भत्ता मिळतो. त्याशिवाय प्रवास भत्ता आणि वैद्यकीय सुविधाही मिळतात. तसेच खासदारांना दिल्लीमध्ये त्यांची वरिष्ठता पाहून घरं दिली जातात. एवढंच नाही तर जे खासदार मंत्री बनतात त्यांना आणखी वेगळ्या सुविधाही मिळतात.

तसेच पेन्शनचा विचार करायचा झाल्यास कुठलाही खासदार कितीही दिवस पदावर राहिला तरी त्यांना प्रत्येक अधिवेशनाच्या हिशोबाने २२ हजार रुपये पेन्शन आणि इतर सुविधा मिळतात.