अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:16 PM 2020-06-14T12:16:48+5:30 2020-06-14T12:24:38+5:30
प्रेमात आकंठ बुडालेल्या डॉक्टरची ही गोष्ट आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रेमवीर रात्री साडे तीन वाजता गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला. मात्र, यामध्ये त्याला जिवाला मुकावे लागले आहे. इंदौरच्या इंडेक्स कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. कोरोनामुळे अनेकांचे वांदे झाले आहेत. मद्यपींना दारू मिळेना, स्मोकरना सिगारेट मिळेना तर प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसींना भेटता येत नव्हते. याच काळात मुंबईचा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी थेट सिंधुदूर्गात पोहोचला होता. जणू काही चंद्रावरच गेल्याचा आनंद त्याला झाला होता. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे.
प्रेमात आकंठ बुडालेल्या डॉक्टरची ही गोष्ट आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रेमवीर रात्री साडे तीन वाजता गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला. मात्र, यामध्ये त्याला जिवाला मुकावे लागले आहे. इंदौरच्या इंडेक्स कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे.
गर्ल्स हॉस्टेलमध्ये या डॉक्टरचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. आयुष राजीव मिश्रा नावाचा डॉक्टर इंडेक्स कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता. कॅम्पसमधील अहिल्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये त्य़ाची प्रेयसी राहत होती.
आयुष हा तिला भेटण्यासाठी रात्री ३.३० वाजता ड्रेनेजच्या पाईपद्वारे हॉस्टेलची इमारत चढत होता. यावेळी पाईप तुटल्याने अपघात झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
आयुषची प्रेयसी लॉकडाऊन मधून सूट मिळाल्याने एक दिवस आधीच गावाहून हॉस्टेलला आली होती. ती आल्यानंतर आयुष तिला भेटण्याची सतत मागणी करत होता. यासाठी तो तिला दर १५ मिनिटांनी फोन करत होता.
अखेर तिने शनिवारी सकाळी ८ वाजता भेटण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आयुषला रहावत नव्हते. लॉकडाऊनमधील विरहामुळे तिला कधी भेटतो असे झाले होते. यामुळे त्याने पाईपद्वारे गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
आयुष मिश्रा हा इंडेक्स हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस झाला होता. त्यानंतर तिथेच इंटर्नशिप करत होता. त्याची प्रेयसीही याच कॉलेजमध्ये शिकत आहे. लॉकडाऊनमुळे ती घरी गेली होती. शुक्रवारीच ती इंदौरला परतली होती. दोघांचेही हॉस्टेल जवळजवळच होते.
हॉस्टेलचा पाईप लोखंडाचा होता. आयुष पाईप पकडून हॉस्टेलच्या छतावर चढला होता. मात्र, टेरेसवरून खाली येण्यासाठीचे गेट बंद होते. यामुळे आयुषने दुसरा प्लॅस्टिकचा पाईप पकडत प्रेयसीच्या खोलीपर्यंत जाण्याचे ठरविले. जसे त्याने त्या पाईपवर वजन टाकले तसा पाईप तुटला आणि आयुष मागील बाजुने जमिनीवर आदळला. जागेवरच आयुषने प्राण सोडले.
दुसरीकडे त्याच्या प्रेयसीला आयुष खाली कोसळल्याचे माहिती नव्हते. हॉस्टेलच्या परिसरात पाणी पसरल्यामुळे महिला सुरक्षा रक्षक पाहण्यासाठी गेल्यानंतर तिला आयुष पडलेला आढळला. यानंतर लगेचच त्याच्या सहकाऱ्यांना बोलावण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये नेले असता आयुषला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयुषच्या मृत्यूची बातमी त्याच्या प्रेयसीला सकाळी देण्यात आली. तिला अश्रू अनावर झाले होते.