महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:15 PM 2020-07-15T15:15:44+5:30 2020-07-15T15:27:48+5:30
हे वाहन लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माओवादी आणि दहतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगापासून रक्षण करेल. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने संरक्षण सामुग्रीच्या क्षेत्रात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनीने एक अत्याधुनिक आणि हायटेक चिलखती वाहन लॉन्च केले आहे. हे वाहन लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माओवादी आणि दहतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगापासून रक्षण करेल.
दरम्यान हे वाहन लवकरच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानामध्ये वापरण्यात येईल. या वाहनाच्या अनावरणाबाबत माहिती देताना आनंद महिंद्रा यांनी या वाहनाचा अर्थ मिन मशीन अर्थात खुप शक्तिशाली वाहन असा केला आहे.
हे वाहन भूसुरुंगरोधी आहे. त्यामुळे रस्तावर पुरून ठेवण्यात आलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटातही ते सुरक्षित राहते. महिंद्रा डिफेन्सने हे दणकट वाहन विकसित केले असून, या वाहनाची निर्यातही करण्यात येणार आहे.
या वाहनाबाबत एसपी शुक्ला यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानामध्ये या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. या चिलखती वाहनाचा बाह्यभाग ट्रकसारखा आहे. तसेच त्याला एक कृत्रिम हात जोडलेला आहे. ज्याद्वारे रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यामध्ये ठेवण्यात आलेली स्फोटके हटवू किंवा बाजूला करता येऊ शकते.
महिंद्रा डिफेन्सचे एक्झिक्युटिव्ह एस.पी. शुक्ला यांनी या वाहनाचा फोटो ट्विट केला होता. हे ट्विट आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात. हे वाहन कुठल्याही मीन मशीनसारखे वाटते. प्रकाश शुक्लाजी या वाहनामध्ये शांतता रक्षकांना सुरक्षित ठेवण्याची महिंद्रा डिफेन्सची वास्तविक भावना सामावलेली आहे. दरम्यान, हे चिलखती वाहन मुंबईतील ट्रॅफीकमध्ये चालवण्यासाठीही उत्तम आहे, अशी कोपरखळीही महिंद्रांनी मारली.
महिंद्रा डिफेन्स ही महिंद्रा अँड महिंद्राची सहकंपनी आहे. तसेच या कंपनीकडून गेल्या ७० वर्षांपासून लष्करी आणि निमलष्करी दलांसांठी सामुग्रीचा पुरवठा करण्यात येत आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून महिंद्राच्या सामुग्रीला मागणी असते.
दरम्यान, सध्या संरक्षण क्षेत्रात भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून पुढाकार घेतला जात आहेत. भारत सरकारने संरक्षण क्षेत्रातील गरजांच्या पुरवठ्यासाठी आवश्यक सामुग्रीपैकी किमान ७० टक्के सामुग्री स्वदेशी कंपनीकडून खरेदी करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.