देशातील साडे सात कोटी ज्येष्ठ नागरिक गंभीर आजाराने पीडित, समोर आली चिंताजनक आकडेवारी By बाळकृष्ण परब | Published: January 7, 2021 01:48 PM 2021-01-07T13:48:42+5:30 2021-01-07T13:55:24+5:30
senior citizens News : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका अभ्यासामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका अभ्यासामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार देशातील ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे सुमारे ७.५ कोटी ज्येष्ठ नागरिक हे कुठल्या ना कुठल्या गंभीर आजाराने पीडित आहेत.
ही आकडेवारी लाँगिट्युडनल एजिंग स्टडी इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांवरील जगातील सर्वात मोठा सर्वे हा २०१७-१८ मध्ये केला होता. त्याचा पहिला भाग काल प्रकाशित करण्यात आला आहे.
या सर्वेमधून समोर आलेली माहिती चिंताजनक चित्र निर्माण करणारी आहे. देशातील सुमारे २७ टक्के ज्येष्ठ नागरिक हे गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचे सर्वेमध्ये दिसून आले. तर सुमारे ४० टक्के वृद्ध हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे अपंग असून, सुमारे २० टक्के ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या झेलाव्या लागत असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये प्राथमिकता निश्चित करण्यासाठी हा सर्वे करण्यात आला होता.
या सर्वेच्या पहिल्या भागात ४५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ७२ हजार २५० व्यक्तींचे नमुने एकत्र करण्यात आले होते. यामध्ये पती-पत्नी अशा दोघांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. या ७२ हजार २५० व्यक्तींमधील ३१ हजार ४६४ व्यक्तींचे वय हे ६० वर्षांहून अधिक तर ६ हजार ७४९ व्यक्तींचे वय हे ७५ वर्षांहून अधिक होते.
हा सर्व्हे भारताचा पहिला आणि जगातील सर्वात मोठा लाँगिट्युडनल डेटाबेस आहे. त्यामधून ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी धोरण आणि कार्यक्रमांची आखणी कऱण्यास मदतगार ठरेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांमधील गंभीर आजारांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये हायपरटेंशन, दृष्टीदोष, स्थूलपणा, कुपोषण आमि श्वसनासंबंधीचे विकार दिसून आले. गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सुमारे दोन तृतियांश ज्येष्ठांवर वेगवेगळ्या आजारांसाठी उपचार करण्यात आले आहेत.
शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांवर ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक उपचार होतात, असे सर्वेमध्ये दिसून आले आहे. देशातील छोट्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात सामाजिक सुरक्षेच्या योजना तुलनेने अधिक प्रमाणात सुरू असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. तसेच देशाच्या उत्तर पूर्व आणि मध्य भारतात सामाजिक सुरक्षेच्या योजना नगण्य असल्याचेही दिसत आहे.