पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 09:51 PM2017-09-16T21:51:16+5:302017-09-16T21:59:53+5:30

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. अर्जन सिंह यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी पाकिस्तानातील लिआलपूरमध्ये झाला होता.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता.

हवाईदलात सेवा बजावताना 60 वेगवेगळ्या प्रकारची विमाने त्यांनी उडवली. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अर्जन सिंह चिफ ऑफ एअर स्टाफ असतानाच हवाईदलाच्या ताफ्यात सुपरसॉनिक फायटर्स, टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि अॅसॉल्ट हेलिकॉप्टर्स दाखल झाली होती.

1965 मध्ये अर्जन सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1969 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली.

1969 रोजी अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होत असतानाही अर्जन सिंह यांचा उत्साह एखाद्या तरुण अधिका-याला लाजवेल असाच होता.

2016 रोजी अर्जन सिंह यांच्या 97 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाईदल तळाला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हवाई दलाचे पानागड विमानतळ आता अर्जनसिंग यांच्या नावाने ओळखले जाते. जिवंतपणी एका विमानतळाला नाव देण्यात आलेले ते एकमेव अधिकारी ठरले.