Mata Vaishno Devi Stampede: त्यामुळे वैष्णौदेवी मंदिरात झाली चेंगराचेंगरी, रात्री २.४५ वाजता काय घडलं? समोर आलं धक्कादायक कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:42 AM 2022-01-01T10:42:30+5:30 2022-01-01T10:55:30+5:30
Mata Vaishno Devi Stampede: नववर्षाच्या स्वागतासाठी वैष्णौदेवी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली असताना चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. यात सुमारे १२ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखणी झाले आहेत. दरम्यान, ही दुर्घटना कशी घडली, रात्री पावणे तीनच्या सुमारास मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी वैष्णौदेवी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली असताना चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. यात सुमारे १२ भाविकांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखणी झाले आहेत. दरम्यान, ही दुर्घटना कशी घडली, रात्री पावणे तीनच्या सुमारास मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कटरा येथील भवन क्षेत्रामध्ये रात्री सुमारे २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. गेट नंबर ३ जवळ ही दुर्घटना घडली. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाचे निर्बंध असतानाही मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी कशी झाली असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरामध्ये रात्री सुमारे २.४५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबवे, त्यामुळे तिथे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळेना. थोड्याशा जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान,या घटनेनंतर प्रशासन तातडीने सक्रिय झाले. तसेच घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
सामूदायिक आरोग्य केंद्राच्या ब्लॉक मेडिकल ऑफिसर गोपालदास दत्तू यांनी सांगितले की, या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांपैकी बहुतांश भाविक हे दिल्ली, हरियाणा, पंजाब आमि जम्मू-काश्मीरमधील आहेत. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, कटरामध्ये माता वैष्णौदेवी भवनातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून दोन दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
वैष्णौदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह हे कटराकडे रवाना झाले आहेत. तर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.