Methanol M-15 Fuel: पेट्रोल-डिझेलला M-5 चा पर्याय? सरकारने सुरू केली चाचणी, जाणून घ्या काय आहे हे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:05 PM2022-05-02T15:05:23+5:302022-05-02T15:13:21+5:30

What is Methanol M-15 Fuel: इथेनॉलनंतर आता पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून सरकार मिथेनॉलवर भर देत आहे. आसाममध्ये 15% मिथेनॉलसह पेट्रोलची चाचणी सुरू झाली आहे.

Methanol M-15 Fuel: वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या किमतीमुळे सरकारने M-15 इंधनाची चाचणी सुरू केली आहे. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात ही चाचणी सुरू झाली आहे. या अंतर्गत 15% मिथेनॉलचे मिश्रण असलेले पेट्रोल प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आले आहे.

हे पेट्रोल सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तयार केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायांवर सरकार सतत काम करत आहे. त्यात 15% मिथेनॉल असल्याने त्याला M-15 असे नाव देण्यात आले आहे. मिथेनॉलची खास गोष्ट म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनांना रिप्लेस करू शकते. ते काही प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेलमध्ये मिसळून देखील वापरले जाऊ शकते किंवा ते 100% वापरले जाऊ शकते.

यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत प्रदूषणही कमी होते आणि ते पर्यायाने स्वस्तही आहे. M-15 च्या वापरामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. मिथेनॉलपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर सुरू केला आहे. भारताने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पेट्रोलमध्ये 15% मिथेनॉल मिसळल्यास वायू प्रदूषण 33 टक्क्यांनी कमी होऊ शकते, तर याने डिझेलला रिप्लेस केल्यास वायू प्रदूषण 80 टक्क्यांनी कमी होईल. सरकारने M15 आणि M100 वापरण्यास मान्यता दिली आहे. डिझेल पूर्णपणे मिथेनॉलने बदलण्याची सरकारची योजना आहे. डिझेल पूर्णपणे बदलल्यास वायू प्रदूषणात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. सरकार 6,000 हून अधिक डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांना मिथेनॉलमध्ये रूपांतरित करण्याचे काम करत आहे.

एकटी रेल्वे दरवर्षी 3 अब्ज लिटर डिझेल वापरते. रेल्वेशिवाय, सरकार जहाजांना 100% मिथेनॉलमध्ये रूपांतरित करण्याचे काम करत आहे, जेणेकरून समुद्रातील प्रदूषण थांबवता येईल. 500 हून अधिक बार्जेस 100% मिथेनॉलमध्ये रूपांतरित करण्याची सरकारची योजना आहे. बार्ज ही एक प्रकारची बोट आहे जी माल वाहतूक करण्यासाठी वापरली जाते.

पेट्रोल आणि डिझेलच्या जागी मिथेनॉल आल्यास त्याचा सरकार आणि सामान्य माणसांना फायदा होईल. मिथेनॉलच्या वापरामुळे सरकारला वार्षिक 5 हजार कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. केवळ पेट्रोलमध्ये 15% मिथेनॉल मिसळल्यास, कच्च्या तेलाची आयात दरवर्षी 15% कमी केली जाऊ शकते.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त होणार असून त्यामुळे तेलाच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळणार आहे. NITI आयोगाने 2020 मध्ये मिथेनॉल संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार एक लिटर पेट्रोल बनवण्यासाठी 36 रुपये खर्च येतो. तर एक लिटर इथेनॉलसाठी 20 रुपये खर्च येतो. जेव्हा खर्च कमी असेल तेव्हा त्याची किंमतदेखील कमी होईल.

सध्या परदेशातून आयात केलेल्या नैसर्गिक वायूपासून भारतात मिथेनॉल तयार केले जात आहे. ते कोळशापासून बनवण्याचे काम सरकार करत आहे. देशात कोळशापासून मिथेनॉलचे उत्पादन होत असल्याने आयातही कमी होईल. इतकेच नाही तर NITI आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की मिथेनॉलचे उत्पादन आणि वितरणामुळे देशात 50 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.