CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:25 AM2020-05-12T10:25:26+5:302020-05-12T10:43:11+5:30

कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत आणि वाहतुकीची रहदारीही जवळपास ठप्पच आहे.

पण या लॉकडाऊनच्या काळातही एक चांगली गोष्ट समोर आली आहे. ताळेबंदीमुळे देशभरातील हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट झाली असून, आकाश निरभ्र, नद्या स्वच्छ झाल्या आहेत

निसर्गानं स्वतःचं स्वतःच शुद्धीकरण करून घेतल्यानं लोक हवेत मोकळा श्वास घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे मुसळधार पाऊस पडल्यामुळे पर्यावरण शुद्ध झाले आहे.

सकाळी उठल्यावर स्थानिक लोकांना नैनीतालचा पर्वतही स्पष्ट दिसतोय. जिथे सूर्योदयाचं नयनरम्य दृष्य पाहता येतंय. लोकांनी त्याचे फोटोही काढले आहेत.

बिजनौरच्या लोकांनी पहिल्यांदाच असे दृश्य पाहिले आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट झाल्याने हा चमत्कार घडला आहे.

बिजनौर ते नैनीतालचे अंतर 175 किमी आहे. लोक म्हणतात की, या पर्वतावरील टेकड्या बिजनौरहून यापूर्वी कधीही दिसल्या नव्हत्या किंवा पर्वताच्या मागून सूर्य उगवलेल्याचं चित्र कधीही पाहण्यात आलं नव्हतं. लोकांचा असा विश्वास आहे की, निसर्गाचा हा चमत्कार लॉकडाऊनमुळे घडला आहे.

कारण सर्वत्र प्रदूषण कमी झाले आहे. नैनितालच्या पर्वतांव्यतिरिक्त बिजनौरहून लॅन्सडाऊनचे पर्वत देखील दिसतात. पावसामुळे हवामान अगदी स्वच्छ झालं आहे.

या काळात पावसानं धूळ जमिनीवर बसली असून, प्रदूषणाची पातळी बर्‍याच प्रमाणात खालावली आहे. दृश्यमानता वाढल्यानं सगळं काही स्पष्ट दिसत आहे.

प्रदूषणाच्या नकाशावर नजर टाकल्यास, कमी प्रदूषणामुळे हे सर्व पर्यटनस्थळांवरील ठिकाणं हिरवीगार झाली आहेत, प्रदूषण वाढते तेव्हा ती लाल होतात.

इंधनातून होणारं कार्बन उत्सर्जन यंदाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी झालं आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आलं असून, प्रवास, काम आणि उद्योग यांच्यावरील अभूतपूर्व निर्बंधामुळे चांगल्या दर्जाच्या हवेची नोंद होत आहे.

तसेच अनेक नद्यांचीही कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या पाण्यापासून मुक्तता झालेली आहे.