modi government going to announce biggest fiscal stimulus package ahead of festive season
दसऱ्याआधी मोदी सरकार करणार सर्वात मोठी घोषणा; जोरदार तयारी सुरू By कुणाल गवाणकर | Published: September 25, 2020 05:34 PM2020-09-25T17:34:01+5:302020-09-25T17:39:40+5:30Join usJoin usNext कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे. गेल्या तिमाहीत जीडीपीमध्ये २३.९ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारला महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारनं आत्मनिर्भर भारत पॅकेज, पीएम गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली. मात्र तरीही अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आता मोदी सरकार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करणार आहे. मोदी सरकार सण उत्सवांचा आरंभ होण्यापूर्वी आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करणार असल्याचं वृत्त मनी कंट्रोलनं दिलं आहे. हे पॅकेज आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि पीएम गरीब कल्याण पॅकेजपेक्षा मोठं असेल. केंद्र सरकारकडून ३५ हजार कोटींच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकतं, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. शहर आणि ग्रामीण भागांतल्या नोकऱ्या या पॅकेजच्या केंद्रस्थानी असतील. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजमध्ये शहरी, ग्रामीण भागातील रोजगार मोठे पायाभूत प्रकल्प, शेतकऱ्यांसाठीच्या नव्या योजना यावर विशेष भर असेल. जनतेच्या हाती अधिक रोकड कशी जाईल, याचा विचार पॅकेजमध्ये केला जाईल. सरकारला यंदाच्या वर्षात किमान २५ मोठे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. या माध्यमातून लोकांना रोजगार मिळेल, असा सरकारचा विचार आहे. दसऱ्याच्या आधी सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करण्यात येईल. अर्थव्यवस्थेला चालना देण्यात हे पॅकेज महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी सरकारला आशा आहे. सणासुदीच्या काळात लोकांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर हा कालावधी ऑटोमोबाईल क्षेत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी महत्त्वाचा आहे. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रांना चालना मिळाल्यास त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सण उत्सवांना सुरुवात होण्यापूर्वीच सरकार आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करणार आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअर्थव्यवस्थाcorona virusEconomy