modi government unlikely to impose lockown as States UTs can customise theirs
CoronaVirus Lockdown News: मोदी सरकारचं ठरलंय! देशव्यापी लॉकडाऊनबद्दल झाला मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:42 PM2021-05-03T18:42:43+5:302021-05-03T18:45:59+5:30Join usJoin usNext देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या २ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली. १ मे रोजी देशात ४ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेलेला नाही. देशातील ५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या राज्यांमध्ये प्रचारसभा झाल्या. त्यातील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ झाली. देशातील सध्याची स्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयापासून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा गांभीर्यानं विचार करा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिला आहे. मात्र केंद्र सरकार लॉकडाऊनच्या विचारात नसल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. मोदी सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात नाही. मात्र राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश निर्बंध कठोर करू शकतात किंवा परिस्थितीनुरुप लॉकडाऊन लावू शकतात, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिल्यानं टाईम्सनं वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेणार नाही. मात्र स्थानिक परिस्थिती पाहून राज्यांनी, केंद्रशासित प्रदेशांनी याबद्दलचा निर्णय घ्यावा. निर्बंध किती कठोर करायचे, लॉकडाऊन कोणत्या स्वरुपाचा लावावा, याचे अधिकार सरकारांना आहेत. त्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत, अशी केंद्राची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं देशातील कोरोना स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनचा विचार करण्याच्या सूचना काल दिल्या. जास्त लोक एकत्र येतील असे कार्यक्रम टाळा, असं न्यायालयानं म्हटलं. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा. लॉकडाऊनचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात याची आम्हाला कल्पना आहे. लॉकडाऊनमुळे असंघटित मजुरांचे हाल होतात. मात्र त्यांची काळजी घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्या, असं न्यायालयानं सुचवलं होतं. त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथॉनी फाऊची यांनीदेखील भारताला लॉकडाऊनचा सल्ला दिला. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येईल, असं फाऊची म्हणाले. लॉकडाऊनचा वापर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी, रुग्णालयं उभारण्यासाठी करता येईल. या कालावधीत लसीकरण वाढवता येईल, असं फाऊची यांनी म्हटलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासर्वोच्च न्यायालयcorona virusSupreme Court