रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा, एकेकाळी राजा राजवाड्यांसाठी लढणारा समाज, इंग्रजांनी कलंक लावला तो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:31 IST2025-01-21T16:27:46+5:302025-01-21T16:31:15+5:30

Mahakumbh Monalisa Viral Girl: ते मुळचे राजस्थानी राजपूत जातीचे आहेत. ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सह अन्य भागात स्थलांतरीत झाले आहेत. ते जिथे गेले तेथील भाषेत यांची भाषा मिसळली आहे.

यंदाच्या महाकुंभमध्ये कथित सुंदर साध्वीनंतर रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला महाकुंभ सोडावा लागला. तिच्या सौंदर्याकडे कॅमेरे वळले आणि जगभरात तिचे फोटो व्हायरल होऊ लागले. तिची प्रसिद्धीच तिच्या आड आली आहे.

ती महेश्वरची राहणार आहे. हे शहर तसे अहिल्यादेवी, किल्ले, मंदिरे आणि साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतू, आता हे शहर सुंदर डोळ्यांच्या मोनालिसासाठी प्रसिद्ध झाले आहे. मोनालिसा उर्फ मोनी ही मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या महेश्वरची रहिवासी आहे. ती पारधी या समाजातून येते. तिची जात आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर सर्च केली जाऊ लागली आहे.

या समाजाचे लोक सांगतात की ते, मुळचे राजस्थानी राजपूत जातीचे आहेत. ते महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सह अन्य भागात स्थलांतरीत झाले आहेत. ते जिथे गेले तेथील भाषेत यांची भाषा मिसळली आहे. राजा रजवाड्यांच्या काळात हे लोक शिकार आणि गोरिल्ला युद्धात निपुण होते.

मौली माता, कालिका माता, सप्तश्रृंगी माता ,वादेखान माता आणि खोडियार माता या त्यांच्या कुलदेवता आहेत.काही भागात ते गुन्हेगारीशी जोडलेले होते, आता ते मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत.

विहिंपच्या दिनेशचंद्र खटोड यांनी सांगितले की, हा समाज आधी समुहाने रहायचा. परंतू, तीन दशकांपूर्वी माजी नगर पंचायत अध्यक्षांनी त्यांना जमीन दिली. यामुळे या लोकांनी तिथे आपापली घरे बांधली. हे लोक देशभरात कंठी माळा बनवितात आणि विकतात. या समाजाच्या मुली बोलण्यास घाबरत नाहीत.

इंग्रजांच्या काळात या समाजाला क्रिमिनल ट्राईब घोषित करण्यात आले होते. १८७१ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता. जवळपास ५०० जातींना यात आणले गेले होते.

१९५२ ला पंडीत जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विमुक्त केले. परंतू, इतर समाजाची त्यांच्याबाबतची धारणा अद्याप बदललेली नाही. आजही त्यांना भटक्या, विमुक्त जमाती असे संबोधले जाते. या कारणानेच त्यांना अद्याप प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले आहे.